ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये चालक अडकला

पुळूज येथील चालकाचा मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे मृत्यू

मोहोळ : ईगल आय मीडिया


अंंगावरील शाल ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लांबोटी ( ता. मोहोळ ) गावच्या शिवारात घडली. शुक्रवार (दि. १९ फेब्रुवारी ) रोजी रात्री पावणेअकरा वाजता सचिन लक्ष्मण खरात (वय ३२ वर्षे, रा. पुळूज ता. पंढरपूर) असे मयत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन लक्ष्मण खरात ट्रॅक्टर चालक असून शेतामध्ये ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरणी, रोटरणी, फनपाळी इत्यादी कामे करतो. शुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी तो लांबोटी शिवारात विठ्ठल करे यांच्या शेतात रोटरणी करीत होता.

रात्री पावणे अकराच्या दरम्यान थंडीमुळे सचिन याने पांघरलेली शाल अचानकपणे रोटर यंत्रात अडकली. त्यामुळे तो रोटरकडे ओढल्याने डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाला.ट्रॅक्टर वाकडा – तिकडा चालत असल्याचे पाहून मोबाईल पाहत बसलेला सचिनचा सहकारी अण्णा कुंभार ( रा. पुळूज ) याने जाऊन पाहीले असता, सचिन जखमी अवस्थेत रोटर यंत्राच्या जॉईंटमध्ये अडकलेला होता. त्यास आवाज देऊनही त्याचा कोणताच प्रतिसाद येत नसल्यामुळे सचिन जखमी होऊन मयत झाल्याची खात्री पटली.

दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारी रोजी या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार बाळासाहेब शेलार हे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!