ट्रॅक्टरसह सहा वर्षीय बालक विहिरीत पडले

माढा तालुक्यातील दुर्घटना : बालकाचा मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

शिंगेवाडी (ता.माढा) येथे ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्यावर काळाचा घाला आला. ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने या मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शंकर पांडुरंग शिंदे असे मृत्यु झालेल्या त्या चिमुकल्याचे नाव आहे.

ट्रॅक्टर आणि मुलगा विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने ग्रामस्थ, नातेवाईकाच्या मदतीने विहिरीतील पाणी काढण्यास सुरुवात केली. मात्र तब्बल सहा तासांनी मृतदेह व टॅक्टर बाहेर काढण्यात यश आले. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी पहाटे दोन वाजता शंकरचे शवविच्छेदन करण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार मृत शंकरचे वडील पाडुरंग यांनी शेतातील काम करुन ट्रॅक्टर विहिरीच्या कडेला लावला होता. ट्रॅक्टर लावलेल्या ठिकाणची जमीन अगोदरच पावसाने भुसभुशीत झालेली आणि त्याच जमिनीला पाणी देखील दिले होते.

ओलसर जमीन खचली आणि उताराला असलेला ट्रॅक्टर अन् त्यावरील मुलगा थेट विहिरीत जाऊन कोसळला. कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार पि.एस.दराडे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!