13 ते 15 जुलै : गाव कडकडीत बंद
तुंगत : ईगल आय मीडिया
कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये म्हणून तुंगत ग्रामस्थांनी 3 दिवस जनता कर्फ्यु पाळला आहे. 13 ते 15 जुलै या दरम्यान तुंगत गाव कडकडीत बंद होते. सोलापूर व पंढरपूर शहरात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरासह तालुक्यातील काही गावात ही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. गेल्या तीन महिन्यापासून अतिशय दक्ष राहून तुंगत गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने संपूर्ण काळजी घेतली आहे.
मात्र ईश्वर वठार या शेजारच्या गावात कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यामुळे तुंगत येथील जनता धास्तावलीं आहे. ग्रामपंचायत, सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेवक,तलाठी, पोलीस पाटील, आ.समिती,म.गांधी तंटामुक्त समितीचे वतीने सावधगिरी बाळगून अत्यावश्यक सेवा वगळता दि.१३ ते१५ जुलै पर्यंत जनता कर्फ्युचे आवाहन केले होते.
गेल्या तीन दिवसांत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवसाय बंद करून स्वयं स्फुर्तीने सहभागी होऊन ग्रामस्थांनी पूर्ण गाव कडकडीत बंद ठेवून १००टक्के प्रतिसाद दिला.
सरपंच आगतराव रणदिवे यांनी , यापुढेही आपण सर्वांनी मिळून या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक ती संपूर्ण काळजी घेतली जावी.स्वंयःशिस्त बाळगून कारणाशिवाय घराबाहेर जाणे टाळावे, पंढरपूर शहरात शक्यतो जाणे टाळावे,बाहेर पडलो तर तोडांला मास्क किंवा रूमालाचा वापर करावा, गर्दीत मिसळू नये. सॅनिटायझरचा वापर करावा,स्वतःची व कुंटुंबासह गावाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.