सोलापूर सह निर्बंध कायम असलेले 11 जिल्हे
टीम : ईगल आय मीडिया
कोरोना रुग्ण संख्या कमी असलेल्या राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असल्याचंही ना.टोपे म्हणाले.
राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार आहेत.
पुढे बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की , राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, निर्बंध हटवण्यात आलेल्या २५ जिल्ह्यांव्यतिरिक्त उरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. तिथे रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, ज्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, त्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन, खासगी कार्यालयांच्या वेळा अशा विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकानं सुरू आणि फक्त रविवारी बंद, खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश असेल. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल.