शेतीच्या वादावरून दोन गटात हाणामारी : 1 जण ठार, 1 जखमी

पाटकूल येथील घटनेने मोहोळ तालुक्यात खळबळ

टीम : ईगल आय मीडिया

बांधाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारी एक शेतकरी ठार तर दुसऱ्या गटातील एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावच्या शिवारात घडली. सुनील गोरखनाथ घोडके (वय ४५ वर्षे रा. पाटकुल ता. मोहोळ) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून अक्षय संतोष एडके (रा. पाटकुल ता. मोहोळ) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जालिंदर विठोबा गावडे, अरुण जालिंदर गावडे, संतोष राजाराम एडके, अक्षय संतोष एडके, रोहन संतोष एडके, चांगदेव विठोबा गावडे (सर्व रा. पाटकुल ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.


या बाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील अरुण जालिंदर गावडे व सुनील बाबुराव घोडके यांची शेती एकमेकांच्या शेतीच्या लगत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये बांधाच्या कारणावरून वाद सुरू आहे. त्यामुळे या ना त्या कारणावरून त्यांच्यात सतत खटके उडत असतात.

शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी सुनील गोरखनाथ घोडके, अनिल गोरखनाथ घोडके व संग्राम गोरखनाथ घोडके हे शेतातील ऊस कारखान्याला जाणार असल्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवत होते. यावेळी जालिंदर विठोबा गावडे, अरुण जालिंदर गावडे, संतोष राजाराम एडके, अक्षय संतोष एडके, रोहन संतोष एडके, चांगदेव विठोबा गावडे (सर्व रा. पाटकुल ता. मोहोळ) तिच्या ठिकाणी येऊन “आमच्या बांधाची माती का घेऊन जाता, आमचा बांध खचून जाईल” असे म्हणून तिघांना मारहाण करू लागले.

या मारहाणीत जमीन खोदण्यासाठी वापरला जाणारा टिकाव सुनील गोरखनाथ घोडके त्याच्या डोक्यात लागल्यामुळे ती गंभीर जखमी झाले. तर अनिल आणि संग्राम घोडके हे किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर सुनील घोडके यास उपचारासाठी सोलापूरच्या रूग्णालयात पाठवून दिले. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी अनिल घोडके यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सहा जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.


दरम्यान अक्षय एडके याच्या डोक्यात सत्तूर लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी पंढरपूरच्या निकम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे पाटकुल गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण गाव सामसूम झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!