आरोपीला जेलबाहेर घेऊन जाणारे ‘ ते ‘ 2 पोलीस निलंबित
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
खून प्रकरणातील आरोपीला मंगळवेढा सबजेल मधून बेकायदेशीररित्या त्याच्या आंबे ( ता. पंढरपूर ) येथील घरी बोकडाच्या जेवणासाठी नेल्याबद्दल निलंबित करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. The eagle eye ने सर्वप्रथम या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.
आंबे ( ता. पंढरपूर ) येथील तानाजी भोसले हा आरोपी एका खून प्रकरणी मंगळवेढा सब जेलमध्ये आहे. शुक्रवार दि 17 जुलै रोजी तानाजी भोसले याच्या आंबे येथील घरी बोकडाचा कार्यक्रम होता. त्या जेवणासाठी मंगळवेढा उपकारागृहातून बाहेर काढून आरोपी तानाजी भोसले हा आजारी असल्याचे कारण दाखवून दुपारी साडेबारा वाजता आंबे येथे नेले होते.
पोलीस नाईक बजरंग माने व उदय ढोणे या दोघांनी आरोपीस खाजगी वाहनातून आंबे येथे त्याच्या घरी जेवणासाठी नेले होते. दरम्यान, आरोपी तानाजी भोसले हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले होते. त्यामुळे आंबे येथील बोकडाच्या जेवणासाठी आलेले शंभराहून अधिक लोक हादरून गेले होते.
या संदर्भात the eagle eye संकेतस्थळावर वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली होती. आरोग्य तसेच पोलिस खात्याने याची गांभीर्याने दखल घेत आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांची चौकशी केली. आरोपीस बेकायदेशीर पणे त्याच्या गावी नेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुरुवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यास भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.
त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पोलीस नाईक बजरंग माने, उदय ढोणे या दोघांना निलंबित केले आहे, अशी माहिती अतुल झेंडे यांनी दिली आहे.
बोकडाच्या या बेकायदेशीर जेवणाचा आणि पॉझिटिव्ह आरोपी तिथे आल्याच्या या घटनेचा पर्दाफाश सर्वात प्रथम the eagle eye या संकेतस्थळावर करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. अखेर चौकशी केल्यानंतर संबंधित आरोपी याला बेकायदेशीररीत्या आंबे घेऊन जाणारे पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.