खेडभाळवणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

खेडभाळवणी ( ता. पंढरपूर ) येथील जुन्या अकलूज रोड चौकालगत एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष दत्तात्रय शिंदे (४५, रा. पंढरपूर) असे मयत इसमाचे नाव आहे.

आज ( सोमवारी ) संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास संतोष शिंदे हे आपल्या दुचाकीवरून पंढरपूर कडे येत असताना जुना अकलूज मार्गावरील खेडभाळवणी चौकाजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली.

मदतीअभावी जीव गेला ? संतोष शिंदे यांच्या मोटारसायकल ला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर अर्धा ते पाऊण तासापेक्षा जास्त वेळ ते रस्त्यावरच पडून होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. पंढरपूर येथून त्यांच्या नातेवाईकांना अपघात झाल्याचे समजल्यानंतर ते सुमारे 12 किमी अंतरावरच्या घटनास्थळी गेले आणि कार मध्ये अत्यवस्थ अवस्थेतील संतोष यांना उपचारासाठी घेऊन आले. तोवर खूप उशीर झाला होता. जर वेळेवर मदत मिळाली असती तर जीव वाचला असता असे बोलले जाते.

या धडकेत गंभीर जखमी झालेल्या संतोष शिंदे यांना पंढरपूर येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. संतोष शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

One thought on “खेडभाळवणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply

error: Content is protected !!