सावधान भीमेला महापूर अटळ : विसर्ग आणखी वाढणार
अशी असेल पंढरपूर येथील भीमेची पाणी पातळी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनी धरणातून सोडला जाणारा रात्री साडे 11 वाजता पुन्हा वाढवून विसर्ग 2 लाख 50 हजार क्यूसेक्स तर वीरचा विसर्ग मध्यरात्री 2 वाजता 32 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदी आज दुपारनंतर धोक्याची पातळी पार करणार आहे. भीमा नदीला महापूर येत आहे. नदी काठच्या लोकांनी सुरक्षित स्थळी जाणे गरजेचे आहे. प्रशासनाने तसे आवाहन केले आहे.
पंढरपूरचा केवळ सांगोला मार्गे संपर्क राहील ! आज भीमा नदीवरील सर्व पूल पाण्याखाली जाणार, पंढरपूर – वेनेगाव, पंढरपूर – मोहोळ – सोलापूर, वाहतूक ठप्प होणार. भंडीशेगाव , उपरी येथील पूल कासाळ ओढ्याच्या पुरामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे सातारा, पुणे, अकलूज या मार्गे येणारी वाहतूक ही ठप्प झाली आहे.
आज ( बुधवारी ) रात्री साडे 11 वाजता वाजता भीमा नदीत उजनीतून 2 लाख 50 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग सोडला आहे. तर वीर धरणातून 32 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. उजनी आणि विरमधून सोडलेला विसर्ग आज दुपारी येथे येण्याची शक्यता असून उद्या दुपारी येथे 3 लाख 25 हजार क्यूसेक्सहुन अधिक पाणी पातळी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा ईशारा दिला आहे.
दरम्यान, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणातील पाणी नियंत्रण उजनी व्यवस्थापनाच्या नियंत्रणा बाहेर जाताना दिसत आहे. धरणातून 2 लाख 50 हजार क्यूसेक्स पाणी सोडले जात असताना इंदापूर तालुक्यातील पुणे – सोलापूर महामार्गावर पाणी आले आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक रात्री ठप्प झाली आहे.
आज दिवसभर पाऊस चालू राहील असे हवामान खात्याने सांगितले असल्याने भीमा नदीतील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीला महापूर निश्चित असून नदी काठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे आवश्यक आहे.