झरे गावातील एकाच कुटुंबातील चौघे जण बेपत्ता
टीम : ईगल आय न्यूज
इंदापूर तालुक्यात उजनी धरणाच्या बॅक वाटर मध्ये नाव बुडून २० तास उलटले तरीही अद्याप बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध लागलेला नाही. दरम्यान बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये झरे गावातील एक अक्खे कुटुंब असल्याचे समोर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. उजनी जलाशयात काल बोट उलटून झालेल्या अपघाताला राजरोसपणे सुरू असलेली बेकायदा जलवाहतूक कारणीभूत ठरली असून यापूर्वीही अशा रीतीने दुर्घटना घडूनहि दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कडाक कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे .
मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातून नावेत बसून ७ जण कुगाव हुन कळाशी कडे निघाले होते. दरम्यान सोसाट्याचा वारा आल्याने नाव पाण्यात बुडाली आणि ७ पैकी ६ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला २० तास उलटून गेले तरीही एकाही बेपत्ता नागरिकाचा शोध लागला नाही. एन डी आर एफ ची दोन बचाव पथके उजनी धरणात या लोकांचा शोध घेत आहेत. मात्र तपास लागला नाही. आज सकाळी खा. सुप्रिया सुळे, खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर घातस्थळी भेट दिली आणि मदत कार्याचा आढावा घेता आहे.

झरे गावावर शोककळा
काल उजनी धरणात बुडालेले सर्व सहा जण करमाळा तालुक्यातील कूगाव व झरे या गावातील असून या परिसरावर कालपासून शोककळा पसरली आहे . झरे (ता. करमाळा ) गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), हे अजून सापडलेले नाहीत . आपल्या पाहुण्यांच्या घरी जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गोकुळ जाधव व त्यांची पत्नी कोमल,दोन चिमुकले हे काल संध्याकाळी कुगव येथून दुपारी कळाशी कडे निघाले होते . यावेळी अचानक सुरू झालेल्या या वादळी वाऱ्यात ही बोट उलटली आणि गोकुळ जाधव,कोमल जाधव आणि दोन्ही चिमुकले भीमा नदीच्या पात्रात बुडाले. काल रात्रीपासून कुगाव् व झरे गावातील गावकरी मोठ्या संख्येने दोन्ही तीरावर गोळा झाले आहेत . भीमा नदीच्या किनाऱ्यावर येऊन बसले आहेत . झरे गावात काल रात्रीपासून शोककळा पसरली आहे.
दररोज शेकडो नागरिक करतात धोकादायक प्रवास
करमाळ्यातून इंदापूर कडे जाण्यासाठी गावागावातून पलिकडच्या तिराला जाण्यासाठी बेकायदा जल वाहतूक राजरोसपणे सुरू असते. अशा बोटींवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने हा सर्व प्रवास जीवावर बेतणारा असतो . यापूर्वीही अशा पद्धतीने बोटीतून पाण्यात गेल्यावर अनेक दुर्घटना घडल्या आहेत . तरीही प्रशासन या धोकादायक प्रवासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असते . करमाळा येथून इंदापूरकडे रोड मार्गे प्रवास करण्यासाठी 100 किलोमीटरचा वळसा मारावा लागतो .यासाठी तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो . मात्र बोटीतून केवळ 5 ते 7 किलोमीटर पाण्यातून हा धोकादायक प्रवास केल्यावर तासाभरात पलिकडच्या इंदापूर तालुक्यात जाता येते. हाच शॉर्ट कट जीवावर बेतू शकतो, त्यामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असतात.