भीमेला पूरस्थिती येण्याची शक्यता !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारा विसर्ग कमी झाला असला तरीही उजनी धरणातील पाणी साठा वाढ वेगवान आहे. आज दुपारपर्यंत धरण 80 टक्केची पातळी पार करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उजनी धरण येत्या 8 दिवसांत भरण्याची शक्यता आहे. तसेच नीरा खोऱ्यातील सर्व धरणे पूर्ण भरल्याने दररोज 10 हजार क्यूसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडले जात आहे. त्यामुळे भीमा नदीला पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
पुणे जिल्ह्यातील सर्व 19 धरणांत 90 टक्के पेक्षा जास्त साठा झालेला आहे. तसेच पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांतून सोडण्यात येणारे पाणी कायम आहे. रविवारी सकाळी येणारा विसर्ग कमी झाला असला तरीही शनिवारी 35 हजार क्यूसेक्स ने पाणी आले आहे, त्यामुळेच उजनी धरण एका दिवसांत 8 टक्के एवढे वधारले आहे. रविवारी सकाळी 8 वाजता उजणीचा पाणी साठा 78.80 टक्के एवढा झाला आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील 8 धरणातून उजनीत पाणी येत आहे.
सकाळी 6 वाजता दौंडचा विसर्ग 20 हजार 749 क्यूसेक्स तर पुणे बंडगार्डन येथील विसर्ग 14 हजार 545 क्यूसेक्स एवढा असल्याने धरणात येणारा विसर्ग कायम आहे.
वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 13 हजार 911 क्यूसेक्स इतका कायम असल्याचे सांगण्यात येते.