उजनी आले ‘साठी’त !

कालव्यातून पाणी सोडले जाणार का ?

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मागील आठवड्यातून संथगतीने वाटचाल सुरू असलेल्या उजनी धरणातील पाणी साठा आज सायंकाळपर्यंत साठी पार करणार असल्याचे चित्र असून पावसाने ओढ दिलेल्या लाभक्षेत्रात उजनीच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडले जाणार की नाही याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

उजनी धरणात जुलै च्या तिसऱ्या आठवड्यात मोठ्या वेगाने वाढ झाली.परन्तु त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणात येणारा विसर्ग कमी झाला आणि तो 8 ते 10 हजार क्यूसेक्स च्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून उजनीच्या पाणी साठ्यातील वाढ अतिशय संथगतीने सुरू असल्याचे दिसते.

दरम्यान आज सकाळी 7 वाजता धरणातील पाणी साथ 59.07 टक्के इतका झाला असून बंडगार्डन येथील विसर्ग 11 हजार 61 क्यूसेक्स इतका आहे, तर दौंड येथे हा विसर्ग 8 हजार 575 क्यूसेक्स एवढा आहे. त्यामुळे संथगतीने का असेना उजनीच्या पाणी साठ्यात वाढ कायम आहे. आज सायंकाळपर्यंत उजनी 60 टक्केचा टप्पा ओलांडून पुढील वाटचाल सुरू राहील.

पावसाचे उर्वरित दिवस लक्षात घेता आता धरण सुरक्षित टप्प्यात आले आहे. त्यामुळे उजनीच्या लाभक्षेत्रातील ओढे, नाले, तळी, तलाव भरून घेण्याची गरज व्यक्त होत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस दिसत असला तरी अद्यापही तळी, तलाव भरलेले नाहीत. मागील 10 दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने आता कालव्यातून पाणी सोडून ओढे,नाले, तळी आणि तलाव भरून घ्यावेत अशी मागणी शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!