मुठा नदीच्या खोऱ्यात दमदार पाऊस : भीमेचा विसर्ग वाढला
पंढरपूर : ईगल आय मीडिया
मागील दोन दिवसांपासून मुळा – मुठा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीच्या विसर्गात वाढ झाली असून त्यामुळेच दोन दिवसांत उजनी धरण मायनस मधून प्लस पातळीला येण्याची शक्यता बळावली आहे.

यंदा पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणावर पावसाने ओढ दिलेली आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असून त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी साठ्यात कासवगतीने वाढ सुरू आहे. जुलै चा तिसरा आठवडा संपला तरीही उजनी धरण उणे 3.34 टक्के या पाणी साठा पातळीवर आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुणे जिल्ह्यातील पावसाकडे लक्ष लागले आहे.
मागील 24 तासात
मुळा मुठा नदीच्या खोऱ्यात वरसगाव धरण 114 मिमी, पानशेत 126 मिमी, पवना 94 मिमी टेमघर 65 मिमी तर मुळशी 59 मिलिमीटर तर भीमा नदीच्या खोऱ्यात वडीवले धरण 89 मिमी, कलमोडी 48 मिमी तर भामा आसखेड 43 मिलिमीटर असा पाऊस झाला आहे. याशिवाय कमी अधिक प्रमाणात सर्वच धरणांवर पावसाने हजेरी लावली असल्याचे दिसते.
हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विशेषतः मुळा -मुठा नदीच्या खोऱ्यात जोरदार पर्जन्य वृष्टी सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पात्रात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग दौंड येथे 8 हजार क्यूसेक्स पेक्षा अधिक झाला आहे. याचा परिणाम होऊन दोन दिवसांत उजनी धरण प्लस पातळीवर येण्याची शुभचिन्हे दिसू लागली आहेत.