उजनी भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकरी एकवटले

शेळवे येथे उजनी कालवा बाधित शेतकऱ्यांची पहिली बैठक संपन्न.


पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी कालवा वितरीका क्र २४ ‘अ’ या कालव्यासाठी जमिनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांची बैठक आज शेळवे येथे संपन्न झाली. या बैठकीला मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते.

उजनी उजवा कालवा वितरीका क्रमांक 24 अ साठी 30 वर्षांपूर्वी भूसंपादन झाले आहे. सुमारे 6 हजार शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. मात्र भूसंपादनापोटी अजूनही योग्य तो मोबदला मिळाला नाही. त्यामुळे उपरी, भंडीशेगाव, शेळवे, खेडभाळवणी, कौठळी, वाडीकुरोली, गादेगाव शिरढोन, वाखरी इत्यादी गावातील शेतकरी संघटित झाले आहेत.

शासनाने जाहीर केलेला मोबदला अतिशय तुटपुंजा असून तो शेतकऱ्यांना मान्य नाही. म्हणून शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला तशा प्रकारे लेखी कळवले होते, शिवाय समृद्धी महामार्गप्रमाणे मोबदला मिळावा, अशी वेळोवेळी मागणीही केली होती. परंतु तरीही या प्रश्नाकडे शासन-प्रशासन व पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अनेक नियम,अटी आणि निकष लावून शासनाने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली व म्हणूनच या धरतीवर कालवाग्रस्त शेतकऱ्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून हजारो कालवा ग्रस्त शेतकऱ्यांना एकत्र आणले.

मागील आठ दिवसांपासून या सर्व शेतकऱ्यांनी उजनी पाटबंधारे विभाग यांची चुकीची ध्येयधोरणे, संबंधित अधिकाऱ्यांच्या चुका, आणि शासन प्रशासनाकडून शेतकऱ्यांची झालेली फसवणूक यावर सविस्तर चर्चा सुरू केल्या. शेळवे येथे आज या सर्व शेतकऱ्यांची पहिली सहविचार सभा आयोजित केली. या सभेसाठी कौठाळी, खेड भाळवणी, शेळवे, भंडीशेगाव येथून मोठ्या संख्येने कालवाग्रस्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

यामध्ये माजी उपसरपंच रमेश काका गाजरे, सरपंच अनिल ज्ञानोबा गाजरे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नागटीळक, खेड भाळवणी ग्रामपंचायत सदस्य कल्याण साळुंखे, नामदेव काका गाजरे, कौठाळी ग्रामपंचायत सदस्य बाळदादा नागटीळक, नितीन पवार,संतोष गाजरे, सुधाकर गाजरे, अरूण आसबे, राहुल गाजरे, शंकर गाजरे, रामदास गाजरे, समाधान गाजरे, सुरज गाजरे, रोहन गाजरे, युवराज गाजरे, सागर साळुंखे, सागर गाजरे, नितीन गाजरे, इकबाल शेख, विट्ठल गाजरे तसेच इतर अनेक कालवा ग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


समाधान गाजरे ,बाळदादा नागटीळक,नितीन पवार, रमेशकाका गाजरे, अरूण आसबे यांनी उपस्थित कालवा ग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यात करण्यात येणाऱ्या उग्र जनांदोलनाची दिशा स्पष्ट करून बुधवार ( दि १४ रोजी ) संबंधित सर्व अधिकारी, आमदार व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरवले आहे.

त्यानंतर तालुक्यात ठीक ठिकाणी उग्र आंदोलन छेडण्यात येईल,तसेच जोपर्यंत कालवा ग्रस्त शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गप्रमाणे भरीव मोबदल्याची तरतूद होत नाही तोपर्यंत पक्ष,पार्टी,गट-तट बाजूला ठेवून फक्त आणि फक्त शेतकरी माय-बापासाठी एकदिलाने लढण्याच सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आले.

Leave a Reply

error: Content is protected !!