धरणावर मोठा पाऊस : दौंड ची आवक वाढली
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या काही तासांपासून उजनी धरणावर आणि पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरणात जवळपास 107 टक्के पाणी साठा झाला आहे. शिवाय दौंड येथे भीमा नदीला येणारा विसर्ग 8 हजार क्यूसेक्स हुन अधिक असल्याने रात्री 9 वाजता उजनी धरणातून भीमा नदीला 5 हजार क्यूसेक्सने पाणी सोडले आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्क रहावे लागणार आहे.
प्रशासन बेफिकीर राहिले उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, हवामान विभागाने दर तास, दोन तासाचे अपडेटेड अंदाज वर्तवले आहेत, तरीही पाणी सोडण्यासंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत निर्णय कळवला गेला नाही. कदाचित धरण प्रशासन नेहमीप्रमाणेच बेफिकीर राहिले असल्याचे बोलले जात आहे.
उजनी धरण आज संध्याकाळी 6 वाजता 107.62 टक्के भरले आहे आणि धरणात येणारा विसर्ग दौंड येथे 8 हजार 116 क्यूसेक्स इतका आहे. शिवाय धरणावर आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उद्या दिवसभरात धरण 110 टक्के पार करणार आहे.
आता धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज रात्री 9 वाजता धरणातून 5 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडले आहे. धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे प्रमाण वाढवले जाईल असेही प्रशासनाने कळवले आहे.