विरचा विसर्ग घटला : 32 हजार क्यूसेक्स
पंढरपूर : ईगल आय मीडिया
दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणावर जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कायम आहे. परिणामी उजनी धरणातील पाणी साठा पन्नाशीकडे निघाला असून दोन दिवसांत धरण पन्नाशी पार करणार आहे. दरम्यान, रविवारी सकाळी वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडे नऊ वाजता हा विसर्ग 32 हजार 368 क्यूसेक्स एवढा करण्यात आलेला आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत सर्वदूर दमदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 6 धरणावर 1 हजार मिली मीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर 2 धरणे 100 टक्के भरली आहेत. खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने तसेच मुळा-मुठा खोऱ्यात अतिवृष्टी सुरू असल्याने भीमा नदीत येणारे पाणी वाढले आहे. रविवारी सकाळी बंडगार्डन येथे भीमा नदीला येणारा प्रवाह 20 हजार 498 क्यूसेक्स होता तर दौंड येथे हाच प्रवाह 28 हजार 583 क्यूसेक्स इतका आहे. हे पाणी उजनी धरणात येत असल्याने उजनीच्या पाणी पातळीत आता वेगाने वाढ होत आहे. रविवारी सकाळी 6 वाजता उजनी धरण 42.43 टक्के एवढे भरले असून धरणात येणार येवा पाहता दोन दिवसांत धरण पन्नाशी पार करणे निश्चित मानले जात आहे.
वीर चा विसर्ग कमी केला
शनिवारी सायंकाळी वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग रविवारी सकाळी साडे नऊ वाजता कमी करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी 41 हजार क्यूसेक्स असणारा विसर्ग रविवारी सकाळी 32 हजार 368 क्यूसेक्स करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहून या निसर्गात कमी, अधिक बदल केला जाईल, तेव्हा नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन नीरा उजवा कालवा विभागाने केले आहे.
कोयना धरणात 88 tmc पाणी साठा
कोयना धरणात सध्या 88 tmc पाणी साठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण गेल्या 4 तासात वाढले आहे. गेल्या 4 तासात महाबळेश्वर येथे 61 mm तर नवजा येथे 90 mm पाऊस झाला आहे. पाण्याची आवक पहाता रविवारी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 cusecs केला जाणार आहे, तेव्हा नदीकाठच्या लोकांनी कृपया दक्षता घ्यावी असे आवाहन कोयना धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.