उजनी : शतकाच्या उंबरठ्यावर !

पाणी साठा पूर्ण होण्यासाठी एका चौकाराची गरज

पंढरपूर : ईगल आय मीडिया

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणातील पाणी साठा शतकाच्या उंबरठ्यावर असून चार टक्के पाणी साठा वाढल्यास धरणातील पाणी साठ्याचे शतक होणार आहे. आज सकाळी धरणाने 96 टक्के पाणी साठ्याचा टप्पा पार केला आहे.

गेल्या दोन दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने 3 दिवसांत 6 टक्के पाणी साठा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने धरणात येणारा विसर्ग खूपच मंदावला आहे. त्यामुळे धरणातील वाढ कूर्मगतीने सुरू आहे. उजनी धरणातील पाणी साठ्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आज सकाळी उजनीतील पाणी साठा 96.04 टक्के आहे, तर आवक दौंड येथे 4 हजार 623 क्यूसेक्स आहे. बंडगार्डन ( पुणे ) येथे केवळ 2 हजार 916 क्यूसेक्स आवक असून उपयुक्त पाणी साठा 51.45 टीएमसी इतका झाला आहे.

ऑक्टोबर महिना उजाडला तरीही धरण 100 टक्के भरलेले नाही. राज्यातील बहुतांश धरणे भरून वाहू लागली असली तरीही उजनी अजूनही 96 टक्केवर आहे. धरणाची पूर्ण साठवण क्षमता 111 टक्के आहे, या हिशोबाने अजूनही उजनी भरण्यास 15 टक्के कमी आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरते की नाही याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत धरणावर मुसळधार पाऊस झाल्यान धरणात 6 टक्केची भर पडली आहे. तर गेल्या 15 दिवसात जेमतेम 13 टक्के पाणी साठा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग अगदीच कमी आहे.

आज सकाळी धरणाने 96 टक्के ची पातळी ओलांडून 96.04 टक्के ची मजल मारली आहे. हा महत्वाचा टप्पा गाठला असून तीन दिवसांत 100 टक्के कधी होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाचा जोर प.महाराष्ट्रात कमी आहे. त्यामुळे उजनीकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे अजूनही धरण पूर्ण क्षमतेने कधी भरणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!