उजनी आज 100 टक्के होणार !

सोमवार चा पुण्यातील पाऊस फायद्याचा ठरला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले उजनी धरण रडत, खडत का असेना आज अखेर 100 टक्केची पातळी गाठणार आहे. सोमवारी पुणे आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत येणाऱ्या पाण्याचं विसर्ग वाढल्याने धरणाची पाणी पातळी आज सांयकाळी 8 पर्यंत 100 टक्के होण्याची शक्यता आहे.

उजनी धरण यंदा अपुऱ्या पावसामुळे कूर्म गतीने भरत आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूरस्थिती आलेली असताना यंदा ऑक्टोबर महिना उजाडला तरीही धरण 100 टक्के झालेले नाही. दरम्यान सोमवारी रात्री पुणे शहर आणि परिसरात, तसेच उजनीच्या बॅक वॉटर क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

काल अडीच हजार क्यूसेक्स असलेला बंडगार्डन येथील विसर्ग आज सकाळी 4 हजार 500 वर होता. तर भीमेच्या खोऱ्यातील धरणातून 3 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडले आहे. आज सकाळी उजनी धरण 98.90 टक्के होते, तर 3 वाजता त्यात वाढ होऊन 99.34 टक्के झाले होते. धरणात येणारा विसर्ग दौंड येथे 6 हजार क्यूसेक्स असल्याने धरण सायंकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत 100 टक्के ची पातळी गाठणार असल्याची माहिती उजनी सूत्रांकडून देण्यात आली.

यापुढे धरणाची साठवण क्षमता 110 टक्के असून उर्वरित काळात धरण 110 टक्के भरण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे तूर्तास तरी धरणातून नदीला पाणी सोडले जाण्याची शक्यता कमी आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!