चांद्रभागेतील मंदिरे, दगडी पूल, नदीतील सर्व बंधारे पाण्याखाली
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शुक्रवारी उजनी धरणावर 96 मिलिमीटर पाऊस झाल्याने उजनीतून भीमा नदीला सोडण्यात येणारा विसर्ग वाढवला आहे. शनिवारी सायंकाळी 30 हजार क्यूसेक्स चा विसर्ग भीमा नदीला चालू आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या पावसाची विश्रांती सुरू असली तरी सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र धो धो पाऊस सुरू आहे. उजनी धरणावर सुद्धा यंदा दमदार पाऊस झाला आहे. शुक्रवारी धरणावर अतिवृष्टी होऊन 96 मिली पाऊस झाला. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून धरणातून विसर्ग वाढवण्यात आला. सकाळी 25 हजार।क्यूसेक्स चा असलेला विसर्ग सायंकाळी 6 वाजता 30 हजार क्यूसेक्स करण्यात आला. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाली आहे.
माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे भीमा नदीला ओढे, नाले मान नदीतून येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. उजनीतून जरी 30 हजार क्यूसेक्स पाणी सोडले असले तरी संगम येथे 48 हजार 681 क्यूसेक्स तर पांढर7 येथे 54 हजार 175 क्यूसेक्स एवढी पातळी होती. शनिवारी सकाळी पंढरपूर येथे 63 हजार क्यूसेक्स एवढा विसर्ग होता मात्र दुपारपासून पाणी काही प्रमाणात कमी झाले आहे.
चांद्रभागेतील सर्व मंदिरे पाण्यात गेली आहेत, तर दगडी पूल ही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली असून उजनी धरण 110 टक्के भरून गेल्याने परतीच्या पावसामुळे पूर येऊन नुकसान होते की काय अशी चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.