भीमेचा विसर्ग 30 हजारांवर वाढला

घोड धरणातून भीमा नदीला पाणी वाढवले : दौंड ची आवकही वाढली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे आणि घोड धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढल्यामुळे शिवाय उजनी धरण पूर्ण 109 टक्के पूर्ण झाल्याने आज ( रविवारी ) सायंकाळी 8 वाजता भीमा नदीला 30 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे उद्या सकाळी 11 नंतर पंढरपूर तालुक्यातील भीमा दुथडी भरून वाहणार आहे, बहुतांश बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून भीमा नदीला 5 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात होते. आज सकाळी 6 वाजता 10 हजार क्यूसेक्स तर सकाळी 8 वाजता यामध्ये वाढ करून 20 हजार क्यूसेक्स ने विसर्ग सुरू केला आहे.

दरम्यान काल पुणे जिल्ह्यात ही दमदार पाऊस झाला आहे, त्यामुळे दौंड येथील पाण्याचा प्रवाह 14 हजार 551 क्यूसेक्स तर बंडगार्डन ही 9 हजार 50 क्यूसेक्सपर्यंत वाढला आहे. आज सायंकाळी साडे सहा वाजता घोड धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 7 हजार क्यूसेक्स केला आहे.

तर 6 वाजता उजनी धरणात 109.76टक्के इतका पाणी साठा झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग रात्री सव्वा आठ वाजता 30 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. शिवाय माळशिरस, माढा, पंढरपूर या तालुक्यात शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने भीमेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!