उजनी कालवा भूसंपादन भरपाई बाबत पहिली बैठक

प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतली माहिती : पाटबंधारे विभागास केल्या सूचना


पंढरपूर : ईगल आय मीडिया


उजनी उजवा कालवा भूसंपादन नुकसानभरपाई संदर्भात प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कार्यालयामध्ये उजनी विभागाच्या अधिकार्‍यांसोबत उजनी कालवा बचाव संघर्ष समितीच्या शेतकरी व पदाधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीत अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून पुढील आठ दिवसात उजनीच्या अधिकार्‍यांनी सर्व अहवाल तयार करून देण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत. यामुळे तालुक्यातील तब्बल 16 हजार शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


गेल्या 30 वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात उजनी उजवा – कालवा वितरिकेवरील भूसंपादन नुकसानभरपाई प्रश्‍न रेंगाळला असून या प्रश्‍नाचा कायमचा निपटारा करण्यासाठी व नव्याने पीक पाणी नोंदी धरून, नव्या रेडीरेकनर कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळण्यासाठी शेतकर्‍यांच्या सुशिक्षित मुलांनी जन संघर्षाचा लढा उभा केला आहे.

मागील महिन्याभरापासून संघर्ष समितीचे पदाधिकारी उजनी पाठबंधारे विभाग व शासन प्रशासनाने भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मान्य नाही म्हणून आक्रमक झाले होते, त्यासंदर्भात त्यांनी आपली बाजू लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडली होती, त्यामुळे प्रांताधिकारी सचिनजी ढोले  यांनी भूसंपादन बाबतीत शेतकर्‍यांचा प्रश्‍न समजून घेऊन बैठक आयोजित केली. या बैठकीत प्रथम शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली.

तत्कालीन तलाठ्यांनी शेतकर्‍यांना विचारात न घेता मनाला वाटेल तश्या पीकपाणी नोंदी लावल्याने शेतकर्‍यांना खूप मोठी किंमत मोजावी लागत आहे, व पाटबंधारे अधिकार्‍यांनी ही प्रत्यक्ष जागेवर येऊन सर्व्हे न करता चुकीचा अहवाल तयार केला व त्यामुळे शेतकर्‍यांना याचा फार मोठा फटका बसला आहे.

तसेच भूसंपादन करताना केलेल्या चुका, मूल्यांकनच्या बाबतीत झालेल्या चुका याबद्दल सविस्तर चर्चा झाली. प्रांत  सचिन ढोले यांनी भूसंपादन अधिकार्‍यांच्या चुका लक्षात आणून देऊन त्या काळजीपूर्वक दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या,तसेच प्रत्यक्ष भूसंपादन ठिकाणी जाऊन सत्यपरिस्थीती पडताळणीसाठी ही सूचना दिल्या.  उपस्थित सर्व शेतकर्‍यांनी आपल्या सर्व समस्या  अगदी स्पष्ट पणे मांडल्या तेव्हा त्यांचेही समाधान झाले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या गोटात आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!