नीरा काठी सतर्कतेचा ईशारा : उजनीच्या साठ्यात वेगाने वाढ
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजता वीर धरणातून नीरा नदीत सोडणारा पाण्याचा विसर्ग 32 हजार 368 क्यूसेक्स पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर भीमा खोऱ्यातील खडकवासला हे मोठे धरण 100 टक्के भरल्याने बंडगार्डन येथे येणारा विसर्ग 16 हजार 723 क्यूसेक्स झाला आहे. त्यामुळे एका बाजूला नीरा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे, तर उजनीच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत असून शेतकरी आनंदित झाला आहे.
निरेच्या खोऱ्यातील चारही धरणे सध्या भरण्याच्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे बुधवारपासून धरणाच्या गेट मधून नीरा नदीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता विरमधील विसर्ग 6 हजार 900 क्यूसेक्स एवढा वाढवण्यात आला आहे. तर दुपारी सव्वा एक वाजता त्यात वाढ करून विसर्ग 13 हजारांवर वाढवला गेला. तर सायंकाळी 4.45 वाजता 3 दरवाजातून हा विसर्ग 23 हजार 120 क्यूसेक्स पर्यंत वाढवण्यात आला.
पावसाच्या प्रमाणानुसार नदीच्या विसर्ग सोडण्याच्या प्रमाणात आणखी वाढ करून गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजता वीर धरणाची 7 गेट्स 4 फुटांनी उचलून वीर मधील विसर्ग 32 हजार 368 क्यूसेक्स एवढा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भीमेच्या खोऱ्यातील खडकवासला हे मोठे धरण 100 टक्के भरले असून या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच उजनीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी उजनी 31.25 टक्के भरले होते. तर दौंड येथे उजनीत येणारा प्रवाह 6458 क्यूसेक्स होता. आणि बंडगार्डन येथील विसर्ग 16723 क्यूसेक्स इतका होता. त्यामुळे उजनीच्या पाण्यात उद्यापासून वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे.