भीमेच्या पातळीत वेगाने वाढ सुरूच
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनी धरणातून सोडला जाणारा सकाळी 7 वाजता कमी करण्यात आला असून तो 1 लाख 50 हजार आहे. तर वीरचा विसर्ग सकाळी 5 वाजता 53 हजार 847 क्यूसेक्स करण्यात आला आहे, त्यामुळे भीमा नदीची पाणी वेगाने वाढते आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्यात एकदम वाढ झाली असून बंडगार्डन येथे 26 हजार 21 तर दौंड येथे 11 हजार 80 क्यूसेक्स ने पाणी उजनी धरणात येत आहे. नदी काठच्या लोकांनी सुरक्षित स्थळी जाणे गरजेचे आहे. प्रशासनाने तसे आवाहन केले आहे.
काल ( बुधवारी ) रात्री साडे 11 वाजता वाजता भीमा नदीत उजनीतून 2 लाख 50 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग आला होता आणि वीर धरणातून 35 हजार क्यूसेक्स होता. सकाळी 7 वाजता 1 लाख 50 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. उजनी आणि विरमधून सोडलेला विसर्ग आज दुपारी येथे येण्याची शक्यता आहे. सकाळी संगम – नीरा नरसिंहपूर येथे 2 लाख 50 हजार क्यूसेक्सहून अधिक पाणी होते. त्यात स्थानिक पाण्याची भर पडून दुपारी येथे 3 लाख 25 हजार क्यूसेक्सहुन अधिक पाणी पातळी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा ईशारा दिला आहे.
आज दिवसभर पाऊस चालू राहील असे हवामान खात्याने सांगितले असल्याने भीमा नदीतील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीला महापूर निश्चित असून नदी काठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे आवश्यक आहे.
पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, आंबेडकर नगर झोपडपट्टी, गुरुदेव नगर या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या लोकांना लोकमान्य विद्यालय, केंद्रे महाराज मठ, तनपुरे महाराज मठ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.