नवीन वाईन, बिअर, दारू दुकानांना हरकत देण्यास ग्रामस्थांचा विरोध
पंढरपूर : eagle eye news
वाखरी ( ता. पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या प्रजासत्ताक दिनाच्या ग्राम सभेत गावातील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे, गावच्या हद्दीत वाढलेले अवैध व्यवसाय या विषयांवर जोरदार खडाजंगी झाली. सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसह अतिक्रमणे काढण्यासाठी कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच गावात दारू, वाईन, बिअर बार ना परवानगी द्यायची नाही असाही ठराव यावेळी एक मताने करण्यात आला. यावेळी उपसरपंच बाळासाहेब लेंगरे, ज्येष्ठ नेते गंगाधर गायकवाड, नानासाहेब गोसावी, जोतीराम पोरे, इब्राहिम मुजावर, चंद्रकांत मस्के, आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
२६ जानेवारी रोजी वाखरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली सरपंच धनश्री साळुंखे या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून ग दाखवले, त्यावर झालेली अंमलबजावणी याविषयी माहिती दिली. यानंतर विषय पत्रिकेतील सर्व विषयांना ग्रामस्थांनी मान्यता दिली. मात्र गावच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक खुल्या जागा, शासकीय जागांवरील अतिक्रमणे याविषयी जोरदार खडाजंगी झाली. सरकारी जागेतील अतिक्रमणे काढण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य घ्यावे, सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हि कारवाई पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत, गावाला जोडणाऱ्या शिंदे वस्ती रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्या रस्त्याचे मुरुमीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
गावच्या हद्दीत वाढलेल्या अवैध व्यवसायास पोलिसांनी आळा घालावा, आश्रम शाळेच्या परिसरात फिरणाऱ्या रोड रोमिओवर पोलीसानी कारवाई करावी, पालखी मार्गाचे काम सुरु असून या कामात सुसूत्रता नाही, दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गावरून होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक पालखी मार्ग बायपास ते जुना अकलूज रॉड अशी वळवण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
बिअर बार, दारू दुकानांना परवानगी नाही
या सभेत गावच्या हद्दीत नवीन दारू विक्री, बिअर बार आणि वाईन शॉप साठी नाहरकत मागणीसाठी आलेल्या तीन अर्जांवर ग्रामस्थांनी तीव्र हरकत घेतली. गावाचे महत्व लक्षात घेऊन एकही नवीन दारू, बिअर बार, वाईन शॉप ला परवानगी देऊ नये, असा एकमताने ठराव करण्यात आला. यावेळी सरपंच धनश्री साळुंखे यांनीही यापूर्वीच्या ग्रामसभेत अशा प्रकारे ना हरकत देण्यात येणार नसल्याचे ठराव झालेले आहेत. तोच निर्णय कायम ठेऊन एकही अर्जास ना हरकत दिली जाणार नाही, असे जाहीर केले.
मराठा आणि धनगर समाज आरक्षणाचा ठराव
यावेळी सेवानिवृत्त जलसंपदा अधिकारी बाळासाहेब पोरे यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे, धनगर समाजाला एस टी प्रवर्गातील त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावे असे ठराव मांडले आणि ग्रामस्थांनी त्यांना मंजुरी दिली.