पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा स्थगित झाला तरीही प्रशासन आणि पालखी सोहळा प्रमुख यांनी योग्य नियोजन केल्यामुळे वाखरी पालखी तळावर परंपरेनुसार संतांचा मेळा जमलेला आहे. आज पालखीतळावर मानाच्या प्रमुख पालख्या एकत्र आल्या आहेत.
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी राज्यातील मानाच्या नऊ पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. वाखरी येथील पालखी स्थळाच्या ठिकाणी या पालख्यांचा विसावा असणार आहे. त्यापैकी निळोबाराय यांची पालखी सव्वाचार वाजता वाखरी येथील पालखी स्थळाच्या ठिकाणी दाखल झाली.
प्रत्येक वारकऱ्याची झाली वैद्यकीय तपासणी:
एसटीतून विविध संतांच्या पालख्या या वाखरी पालखी तळाच्या ठिकाणी आल्यानंतर आरोग्य विभागाकडून सर्व वारकऱ्यांचे तपासणी करण्यात आली तसेच फिजिकल डिस्टन्स पळून पादुका घेऊन आलेले वारकरी हे नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचत होते.
रांगोळी काढून स्वागत:
विविध संतांच्या पालख्यांचे जिल्हा प्रशासनाकडून रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. पालखी स्थळाच्या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी हे राबताना पाहायला मिळाले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने या पालखीचे स्वागत करण्यात आले या पालखीमध्ये वीस वारकऱ्यांचा समावेश आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष साधना भोसले, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ भोसले यांच्यासह नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी स्वागतासाठी उपस्थित होते. पालखी तळाच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी तळ परिसर हा जणू बंद करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सात वाजेपर्यंत पालखी तळापर्यंत पालखी ठिकाणी येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या ठिकाणी सर्व पालख्या एकत्र आल्यानंतर रात्री साडे आठ ते नऊच्या दरम्यान या ठिकाणी स्नेहभोजन घेऊन पंढरपूर या ठिकाणी मुक्कामास रवाना होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.