परंपरेनुसार होणार संतांचा मेळावा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीची पायी वारी खंडित झाली असली तरी वाखरी येथून संतांचा मेळा होऊन एकत्रितपणे पंढरीत येण्याची शेकडो वर्षांची परंपरा मात्र जोपासली जाणार आहे. त्यासाठी वाखरी पालखी तळावर कोविड नियम पाळून, परंपरा जपण्यासाठी पूरक सर्व ती तयारी करण्यात आली आहे.
20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून दहा संतांच्या मानाच्या पालख्या या सर्वप्रथम वाखरी येथील पालखीतळावर येणार आहेत. या ठिकाणी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत पालख्या येतील, त्यानंतर त्यांचे पारंपरिक कार्यक्रम, संतांच्या भेटी, भजन,कीर्तन होऊन त्यांच्या माना प्रमाणे पालख्या पायी चालत प्रत्येकी 40 वारकऱ्यांसह पंढरीकडे निघतील. इसबावी विसावा इथपर्यंत पायी चालत पालख्या येतील. तेथून पुढे प्रत्येक पालखी सोबत 2 वारकरी असतील आणि उर्वरित वारकरी बस मध्ये बसून पुढे पंढरीत पोहोचतील. पालखी मार्गावर पूर्णपणे पोलीस बंदोबस्त असणार असून संचारबंदी असल्याने कोणीही स्थानिक किंवा परवानगी नसलेली व्यक्ती सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाही. दर्शनासाठी येऊ शकणार नाही.
या ठिकाणी दहा पालख्यांना थांबण्यासाठी वॉटर प्रूफ दहा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक पालखीतील चाळीस वारकऱ्यांना थांबण्याची आणि भोजनाची सोय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून येथे केली जाणार आहे. तसेच बॅरिकेटींग, स्वच्छता, विद्युतव्यवस्था, स्वछतागृहे, आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय व्यवस्था, वॉटरप्रुफ मंडप आदी व्यवस्था पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यानी दिली आहे.
सध्या कोरनाचा संसर्ग असल्यामुळे प्रतीकात्मक पद्धतीने आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतोय. त्यामुळे वाखरी पालखी तळावर परवानगी असलेल्या व्यक्ती शिवाय कोणालाही प्रवेश असणार नाही. वाखरी येथील पालखी तळाला सर्व बाजूूनेे लोखंडी बॅरिकेट लावून, जाळी बसवूूून पूूूूर्ण बंदिस्त केले आहे.
तसेच पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तत्काळ मिळाव्यात, आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वाखरी तळ येथे अत्यावश्यक सेवा कक्ष, तसेच मंदिर समितीकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालख्या पंढरीत आल्यानंतर विसावा मंदिर, चंद्रभागा नदी वाळवंट, तुकाराम भवन, मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह, गोपाळपूर, सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय अशा वेगवेगळ्या 14 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती देखील प्रांताधिकारी सचिन ढोले यानी दिली.