मंदिरात विणा घेऊन थांबणाऱ्याला यंदा महापूजेचा मान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजा मध्ये मानाचा वारकरी म्हणून यंदा श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावणाऱ्या पाथर्डी ( जि. अहमदनगर ) येथील विठ्ठल ज्ञानदेव बढे या वारकऱ्याला मिळणार आहे. अनेकन वर्षापासून ही परंपरा चालू असताना पहिल्यांदाच एखादा विठ्ठल नावाचा वारकरी महापूजेचा मानकरी ठरला आहे. विशेष म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सध्याचे कार्यकारी अधिकारीसुद्धा विठ्ठल जोशी हेच आणखी एक विठ्ठल आहेत.
यंदा दर्शन रांगेतील भाविक निवडता येत नसल्याने मंदिर समितीने शासकीय महापूजेचा मान विणेकरी असलेल्या विठ्ठल बढे यांना दिला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून पहारा देत आहेत. त्यांचे कुटुंबीय माळकरी असून ते देखील वारी करतात. सोमवारी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत चिठ्ठी काढून त्यांची निवड करण्यात आली. कोरोना महामारी मुळे यंदा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच दर्शन बंद असल्याने मंदिर समितीकडून श्रीविठ्ठल मंदिरात विणेकरी ची सेवा बजावणाऱ्या पाच-सहा वारकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठीद्वारे निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदींच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.