21 हजार क्यूसेक्स ने नीरा दुथडी ।
पंढरपूर : ईगल आय मीडिया
वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणार विसर्ग रात्रीत दोन वेळा वाढवण्यात आला असून 5 दरवाजे उघडून पहाटे साडेपाच वाजता तो 21 हजार 505 क्यूसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
नीरा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खोऱ्यातील धरणे वेगाने भरू लागली आहेत. पूर नियंत्रण करण्यासाठी नीरा उजवा कालवा विभागाने आज मध्यरात्री साडे बारा वाजता वीर धरणातून नीरा नदीला 4 हजार 637 क्यूसेक्स पाणी सोडले आहे.
त्यात पहाटे 2 वाजता वाढ करून 12 हजार 408 क्यूसेक्स करण्यात आला. मात्र पहाटे साडेपाच वाजता त्यात आणखी वाढ करून तो 21 हजार 505 क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच वीज निर्मितीसाठी 800 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
गेल्या 3 दिवसांत या धरणांवर आणि घाटमाथ्यावर ढगफुटी झाल्याने अभूतपूर्व अशा पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वीर धरण 71 टक्के भरले आहे. 24 तासात ही वाढ झाल्याने वीर धरणातून कोणत्याही क्षणी नीरा नदीला पाणी सोडले जाईल असे धरण व्यवस्थापनाने सांगितले होते. तशा प्रकारच्या सूचना पुणे, सातारा आणि सोलापूर प्रशासनाला दिल्या आहेत. नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, नदी पात्रात जाऊ नये अशा सूचना देण्यात येत आहेत.