‘वीर’मधून वाहिले 39 टी. एम. सी. पाणी

नीरा उजवा कालवा विभागाने पूरस्थिती टाळण्यासाठी केले उत्कृष्ट नियोजन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

नीरा खोऱ्यातील सर्व धरणातील एकूण 39 टी एम सी पाणी या पावसाळ्यात अतिरिक्त झाल्याने सोडून द्यावे लागले आहे. मात्र नीरा उजवा कालवा विभागाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे एवढे पाणी सोडूनही नीरा नदी काठी किंवा भीमा नदीला सुद्धा वीर च्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली.

नीरा नदीच्या खोऱ्यात वीर, भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी ही धरणे येतात. निरेच्या खोऱ्यात पर्जन्यमान चांगले असल्याने ही 4 ही धरणे दरवर्षी हमखास भरतात. दरवर्षीचा अनुभव असल्याने नीरा उजवा कालवा विभागाच्या वतीने अतिशय योग्य नियोजन केले जाते आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा तशीच होते. यावर्षी निरेच्या खोऱ्यात पावसाने सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे हजेरी लावली नाही त्यामुळे धरणे उशिरा भरली नव्हती, ऑगस्ट अखेरीस धरणे भरल्या नंतर पाणी सोडण्यात आले. मात्र नीरा नदीला पूरस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली गेली.

निरेच्या खोऱ्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता आणि एकूण साठा खालील प्रमाणे आहे. * वीर धरण – 9.408 tmc. * भाटघर -23.502 tmc, * नीरा देवघर – 11.729 tmc आणि * गुंजवणी 3.690 tmc नीरा खोऱ्यातील सर्व 4 धरणांची साठवण क्षमता 48.329 t m c इतकी आहे. आणि या हंगामात धरणातून 39.22 tmc पाणी सोडून द्यावे लागले आहे.

वीर धरण हे निरेच्या खोऱ्यातील शेवटचे धरण असल्याने वरील धरणातून सोडलेले पाणी वीर मध्ये साठवले जाते. आणि अतिरिक्त झालेले पाणी वीर मधूनच सोडले जाते. वीर धरणातून यंदाच्या हंगामात तब्बल 39 टी एम सी एवढे पाणी सोडले गेले. विशेष म्हणजे वीर धरणाची पाणी साठवण क्षमता ही सुमारे 9.50 टी एम सी आहे. म्हणजे या धरणाच्या चौपटहुन अधिक पाणी सोडून द्यावे लागले. मात्र हे पाणी सोडताना पूरस्थिती टाळण्यात नीरा उजवा कालवा विभागास यश आले आहे. जास्तीत जास्त 53 हजार क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आणि हा विसर्ग सातत्याने कमी अधिक करण्यात येऊन नदी काठच्या गावांची, शेतीची सुरक्षितता जपण्यात आल्याचे दिसले.

एका बाजूला उजनी धरण व्यवस्थापनाच्या ढिसाळपणामुळे काही तासात विसर्ग 10 हजार वरून 2 लाख 50 हजार क्यूसेक्स करण्यात आला आणि लाखो हेक्टर शेती पाण्याखाली लोटण्यात आली. तर दुसऱ्या बाजूला नीरा उजवा कालवा विभागाने 39 टी एम सी पाणी सोडूनही निरेचे पातळी ईशारा पातळीवर आली नाही. पाणी सोडताना ही रात्रीच्या वेळेस सोडले जायचे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत दिवसा वाढ होत असायची. दररोज नागरिकांना यासंदर्भात सूचित करण्यात येत होते. त्यामुळे विरच्या पाण्यामुळे नीरा नदीला पूर आला नाही आणि कसलेही नुकसान झाले नाही.

उलट जेव्हा उजनीतून बेसुमार पाणी सोडावे लागले तेव्हा वीर मधून पाणी नियंत्रित प्रमाणात सोडून भीमेची पूरस्थिती अधिक गंभीर होणार नाही याचीही दक्षता घेतली गेल्याचे अनुभवास आले. यंदाचा पावसाळा आता जवळपास संपला असून आता नीरा उजवा कालवा विभागास पुढील वर्षभरातील पाणी वाटपाचे नियोजन करावे लागेल. यावर्षी उत्कृष्ट नियोजन करून पूरस्थिती टाळल्याने नीरा नदी काठच्या नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!