नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
नीरा नदीच्या खोऱ्यात गुरुवारी अभूतपूर्व असा पाऊस झाला आहे,त्यामुळे आज मध्यरात्री साडे बारा वाजता वीर धरणातून नीरा नदीला 4 हजार 637 क्यूसेक्स पाणी सोडले आहे. तसेच वीज निर्मितीसाठी 800 क्यूसेक्स पाणी रात्री 8 वाजल्या पासून सोडण्यात येत आहे.
गेल्या 3 दिवसांत या धरणांवर आणि घाटमाथ्यावर ढगफुटी झाल्याने अभूतपूर्व अशा पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वीर धरण 71 टक्के तर नीरा देवघर 76 टक्के भरले आहे. भाटघर धरण ही 47 टक्के भरले आहे.
या पार्श्वभूमीवर 24 तासात ही वाढ झाल्याने वीर धरणातून कोणत्याही क्षणी नीरा नदीला पाणी सोडले जाईल, असे धरण व्यवस्थापनाने सांगितले होते. तशा प्रकारच्या सूचना पुणे, सातारा आणि सोलापूर प्रशासनाला दिल्या आहेत. आज नीरा नदीला पाणी सोडण्यात आले असून नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, नदी पात्रात जाऊ नये अशा सूचना देण्यात येत आहेत.