उद्या श्री विठ्ठल च्या चेअरमन पदाची निवड

भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आम.भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड उद्या ( सोमवार, 21 डिसेंबर ) रोजी होत आहे. दरम्यान दिवंगत चेअरमन आम भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांची चेअरमनपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आ.भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे हे पद रिक्त झाले असून नव्या चेअरमन निवडी साठी सहायक निबंधक एस. एम. तांदळे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाची मीटिंग बोलावण्यात आली आहे. यावेळी चेअरमन पदाची निवड करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सरकोली येथे आल्यानंतर कारखान्याची इत्यंभूत माहिती घेतली आहे. सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे, कारखाण्याचे प्रमुख संचालक, अधिकारी यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर खा. पवारांनी योग्य त्या सूचना केल्या आहेत असे समजते.

सर्व संचालकांना या निवडीची नोटीस पाठवण्यात आली असून नवीन चेअरमन पदी कुणाची वर्णी लागते याकडे विठ्ठल परिवारासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारखान्याच्या चेअरमनपदी आ.भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

त्यानुसार सध्या तरी चेअरमनपदी भगीरथ भालके यांची निवड निश्चित मानली जात आहे. बहुतांश सर्वच संचालकांनी सुद्धा भारत नाना यांच्या नंतर भगीरथ यांचीच चेअरमनपदी निवड करावी अशी ईच्छा बोलून दाखवल्याने भगीरथ भालके यांचीच निवड होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!