गुरुवारी ( दि. 8 रोजी ) विठ्ठलचा बॉयरल प्रदीपन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गुरुवार ( दि 8 ऑक्टो ) रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ असून या गाळप हंगामात किमान 10 लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. त्यादृष्टीने सर्व नियोजन पूर्ण झाले आहे.
दरम्यान एक वर्षाच्या खंडानंतर कारखाना यंदाच्या हंगामात सुरू होत असल्याने विठ्ठल परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा आहे. मात्र गेल्या वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद होता, यंदा मात्र कारखाना सुरू होत असून किमान 10 लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणा तयार केली आहे.
यंदा चांगल्या पावसामुळे कारखाना कार्यक्षेत्रात उसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कारखान्याच्या सभासदाच्या सर्व उसाचे गाळप वेळेत करण्याचे उद्दिष्ट ठेऊन संचालक मंडळाने नियोजन केल्याचे सांगितले जाते. गुरुवारी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी कारखान्याचे संचालक भगीरथ भालके आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन होत आहे.
कारखान्यासमोरील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत आणि यंदा मोठा गाळप हंगाम होत आहे, तसेच पुढील वर्षिसुद्धा मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने कारखान्याला पुनर्रवैभव मिळणार असल्याचे।मानले जात आहे.