चपला घालून ‘संत नामदेव पायरी’वर भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस

पंढरीत ‘भाजप’ची मंदिर उघडा आंदोलनाच्या नावावर स्टंटबाजी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

वारकरी संप्रदायात विठोबा माऊलींच्या नंतर ज्या संत नामदेव महाराज समाधी स्थळास पवित्र मानले जाते त्या नामदेव पायरीच्या वर आणि मंदिराच्या प्रवेश द्वारावर चपला घालून भाजप च्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. मीडियावर झळकण्यासाठी काही टवाळखोर कार्यकर्त्यांनी पायात चपला व हातात भाजपचे झेंडे घेऊन संत नामदेव पायरीवर धुडगूस घालून पवित्र स्थळाच्या पावित्र्याचा बाधा आणली. ज्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींच्या आणि विठोबा रखुमाईच्या नावाचा जयघोष घुमतो त्या पवित्र ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा भेसूर घोषणा दिल्या गेल्या आणि वारकऱ्यांचा भगव्या झेंड्या ऐवजी भाजपचे पक्षचिन्ह असलेले झेंडे विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर फडकवले गेले. वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल मंदिर, संत नामदेव महाराज समाधी स्थळाचे पावित्र्य भंग करणाऱ्या भाजपच्या या स्टंटबाजीबद्दल वारकऱ्यांनी आणि पंढरपूरकरांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातमी वाचा !


महाराष्ट्रातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. सोलापूूूर जिल्हा भाजपच्या वतीने आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर ‘मंदिर उघडा’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वारकरी संप्रदायातील प्रमुख धुरींनानी सहभाग न घेतल्याने या आंदोलनाचा मुळातच पुरता फज्जा उडाला होता.


पूर्वनियोजित आंदोलनामुळे पन्नासहुुुन अधिक कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन दाखल झाले. भारतमाता की जय आणि भारतीय जनता पक्षाच्या नावाने घोषणाबाजी सुरु झाली. तासभर घोषणाबाजी करुन देखील वारकरी संप्रदायातील कोणीच महाराज आंदोलनाकडे फिरकेनासे झाल्याने, आंदोलनकर्ते सैरभैर झाले. आंदोलनात वारकरी दिसत नसल्याने, आंदोलनाची सुपारी घेणाऱ्या एका ख्यातनाम महाराजांना दक्षिणा देऊन पाचारण करण्यात आले. भाडोत्री वारकरी आल्यानंतर आंदोलनस्थळी टाळ, मृदुंगाचा आवाज घुमू लागला.

मंदिराचे दरवाजे बंद आहेत हे माहीत असताना देखील काही टवाळखोर कार्यकर्यांनी मीडियात झळकण्यासाठी हातात झेंडे घेऊन मंदिराच्या नामदेव पायरीकडे कूच केली. पायात चपला, बूट घालून भाजपाच्या नावाने जयघोष करीत, आणि पक्षाचे झेंडे फडकवत हे कार्यकर्ते संत नामदेव पायरीवरुन मंदिरात शिरण्याचा स्टंट करु लागले. तेंव्हा मंदिराच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी या बेलगाम कार्यकर्त्यावर बळाचा वापर करुन अटक केली.

या आंदोलनात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदींसह पक्षाचे मोजके पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

एरव्ही धर्म आणि संस्कृती आपली मक्तेदारी असल्याचा आव आणणाऱ्या भाजपला आज मात्र वारकरी परंपरा, संत नामदेव महाराज समाधी स्थळ, विठ्ठल मंदिराचे प्रवेशद्वार, वारकरी संप्रदायाची भगवी पताका, हरी नामाचा जयघोष याचा विसर पडल्याचे दिसून आले. पक्षाच्या नावाने हिडीस आणि ओंगळवाणे प्रदर्शन भाजपच्या स्टंटबाज पुढारी आणि पदाधिकाऱ्यांनी केल्याचे दिसून आले. यामुळे वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी पसरली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!