खा. शरद पवारांनी भालके कुटुंबियांचे केले सांत्वन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
विठ्ठल परिवाराने ज्याप्रमाणे कै. औदुंबरआण्णा पाटील, भारतनाना भालके यांना एकत्रित राहून साथ दिली तशीच एकी आताही दाखवून काम करावे. कारखान्यासह या भागाच्या विकासासाठी तुमची एकी आहे, काही दिवसात मी पुन्हा पंढरपूरला येणार आहे. त्यावेळी बसून आपण पुढे काय करायचे ते ठरवू यात मात्र विठ्ठल परिवाराने आता एकत्र राहणे गरजेचे आहे. मी 80 वर्षाचा असून वडीलधारा आहे. या नात्याने माझे लक्ष या भागावर अधिक असणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली. सरकोली ( ता.पंढरपूर ) येथे कै. आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले असता बोलत होते.
त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, आ.यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार, माजी आ. दीपक साळुंखे, सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, लतीफ तांबोळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. अनिता नागणे, व विठ्ठलचे संचालक उपस्थित होते. सरकोली येथे पवार यांनी कै.भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके व कुटुंंबाची भेट घेतली.
पवार यांनी उपस्थित लोकांना संबोधित स्पष्ट केले की, कै. भारतनानांनी पंढरपूर व मंगळवेढ्याचा विकास, मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागातील पाणी योजना, विठ्ठल कारखाना यासाठी सतत काम केले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने दुःख झाले आहे. मात्र या दुःखातून सावरून विठ्ठल परिवाराने एकत्र राहून त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मध्यंतरीच्या काळात राज्यातील साखर कारखानदारी ही दुष्काळात कमी ऊसपुरवठा तसेच यानंतर साखरेचे दर कोसळल्याने अडचणीत आली आहे. साखर कारखाने चांगले पाहिजेत व यातून शेतकर्यांचे अर्थकारण सुधारले पाहिजे. निवडणुका येतात जातात मात्र संस्था टिकल्या पाहिजेत. कै. भारत भालके यांचे अचानक निधन झाले आहे. या दुःखातून सावरून तुम्ही सर्वांनी एकत्र येवून काम करा, मी तुमच्या सोबत आहे. असा विश्वास शरद पवार यांनी दिला.
कै. भारत भालके यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, भारतनाना ही अनेक पक्षांकडून निवडणुका लढविल्या व ते विजयी ही झाले. मात्र त्यांनी माझ्या प्रती प्रेम कधीच कमी होवू दिले नाही. निवडणुकीत विजय मिळविला की ते बारामतीमध्ये येत. मला हार देऊन म्हणत, मी आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौर्यादरम्यान सरकोलीत मोठ्या प्रमाणात भालके समर्थकांनी गर्दी केली होती. कल्याणराव काळे यांच्यासह अनेकजणांनी येथे आपली मनोगत व्यक्त केली.