लॉक डाऊनच्या काळात आणखी एक प्रलंबित प्रश्न सुटणार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री विठ्ठल व रूक्मिणी मूर्ती संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची परवानगी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने शासनाच्या
न्याय व विधी खात्याकडे मागितली होती. यास मान्यता देण्यात आली ही प्रक्रिया आता २३ व २४ जून रोजी पार पडणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी येथे येणार आहेत. तर श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्तीस चौथ्थांदा वज्रलेप करत असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्णिमी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने १६ मार्च रोजी राज्य शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे मूर्तीना वज्रलेप करण्याची परवानगी मागितली होती. यास ४ जून रोजी मान्यता देण्यात आली होती. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने या काळातच पुरातत्व विभागाकडून हे वज्रलेपन करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्याप्रमाणे आता वज्रलेप केला जात आहे.
यापूर्वी ही मूर्तीवर १९९८ , २००५ व २०१२ मध्ये वज्रलेप करण्यात आले होते. २०१२ मध्ये आठ वर्षापूर्वी शेवटचा वज्रलेप करण्यात झाला होता. दर पाच वर्षानंतर मूर्तीना हा लेप द्यावा अशी सूचना पुरातत्व विभागाने केली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधिक्षकांनी (रसायनतज्ज्ञ) मूर्तीची पाहणी केली होती व वज्रलेप करण्याची शिफारस केली होती. यानंतर मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे यासाठी परवानगी मागितली होती. औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक रसायनतज्ज्ञ श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य व सल्लागार परिषदेचे सदस्य यांच्यासमक्ष २३ व २४ रोजी श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या मूर्तीस वज्रलेप करण्यात येणार आहे.