चेअरमन अभिजीत पाटील यांचे घोषणा
पंढरपूर
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आगामी २०२४-२५ या गाळप हंगामात १२ ते १४ लाख टन उसाचे गाळप करणार असून ३ हजार ५०० रुपये प्रतिटन भाव देईल, असे घोषणा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आज गुरसाळे येथे केली.
कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाच्या निमित्ताने मिल रोलरचे पूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हभप माळखंबीकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, सभासद उपस्थित होते. सभासदांनी टाळ्यांच्या गजरात अभिजित पाटील यांच्या घोषणेचे स्वागत केले.
यावेळी पुढे बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, मागील हंगामात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दहा लाख टन ऊसाचे गाळप केले होते, आणि ३ हजार रुपये दर जाहीर केला होता, त्याप्रमाणे दर दिलेला आहे. आगामी हंगामात पहिल्या दिवसापासून प्रतिदिन १० हजार टन क्षमतेने गाळप सुरू होईल आणि बारा ते चौदा हजार प्रतिदिन या क्षमतेने गाळप केले जाईल. तसेच आगामी हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसास ३ हजार ५०० रुपये प्रति टन दर दिला जाईल, अशी घोषणा पाटील यांनी केली.
यावेळी ह भ प माळखंबीकर कारखान्याच्या उपाध्यक्ष सौ. प्रेमलता रोंगे, कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, संचालक मंडळ कार्यकर्ते ,शेतकरी सभासद उपस्थित होते.