स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांना आवाहन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक, तोडणी वाहतूक ठेकेदार, कामगारांच्या थकीत बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 जुलै रोजी कारखाना स्थळावर हालगीनाद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी दिली. तसेच यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
श्री विठ्ठल सह साखर कारखान्याकडे थकीत ऊस उत्पादकांचे FRP बिल ,कामगारांचे पगार आणि तोडणी वाहतूकीची बिले प्रलंबित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कारखान्याची बिल थकीत आहेत चेअरमन, संचालक मंडळ ही बिले देण्यासाठी कसलेही प्रयत्न करीत नाही असे दिसून येते.
प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
15 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनासंदर्भात प्रांताधिकारी सचिन ढोले यांनाही संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहाजहान शेख, सचिन अटकळे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना, लाॅकडाऊन, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना कारखाना प्रशासनाने वेठीस धरले आहे. वाट पाहून थकलेले शेतकरी कारखाना कार्यस्थळावर येऊन ऊस बीलासाठी आंदोलन करू लागले तरीही चेअरमन व संचालक मंडळ अद्यापही या संदर्भात गंभीर झालेले दिसत नाही. ऊस घातला पण बिल देताना कुणीच जबाबदारी घेत नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार व तोडणी वाहतूक ठेकेदार यांना पैसे कुणाला मागायचे असा प्रश्न पडला आहे.
या पार्श्वभूमीवर संचालक मंडळ, चेअरमन आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी उद्या 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळावर आंदोलनासाठी शेतकरी कामगार व तोडणी वाहतूक ठेकेदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.