तरीसुद्धा 30 सप्टेंबरपर्यंत विठ्ठल मंदिर बंदच रहाणार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मागील पाच महिन्यापासून भाविकांना दर्शनासाठी बंद असलेले श्री विठ्ठल मंदिर खुले करावे या मागणीसाठी विश्व वारकरी सेना – वंचित बहुजन आघाडीने मोठे आंदोलन केले असले तरीही दुसऱ्याच दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला असून 30 सप्टेंबरपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार आहे.

राज्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रभाव आणि राज्य शासनाने वाढवलेला लॉक डाऊन चा कालावधी, राज्यातील मंदिरे खुली करण्यास घातलेली बंदी या पार्श्‍वभूमीवर मंदिर समितीने हा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.

कोरोनामुळे 17 मार्चपासून श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढलेला आहे, पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना बाधित आकडा दोन हजारहुन अधिक झालेला आहे.
त्याचबरोबर राज्य सरकारने 31 ऑगस्ट रोजी नव्याने आदेश कडून 30 सप्टेंबर पर्यंत राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सर्व सदस्यांची चर्चा करून एक मताने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात समितीचे सहध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिर खुले करण्यासाठी पंढरीत मोठे आंदोलन झाले. त्यावेळी आंबेडकर यांनी आठ दिवसात मंदिर खुले करण्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. तरीसुद्धा मंदिर समितीचा हा निर्णय आल्याने मंदिर खुले करण्याच्या आंदोलनाला आणखी बळ देणारा हा निर्णय ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!