अस्मानी संकटात उध्वस्त शेतकर्‍यांना मदत करणे समाजाचे कर्तव्य : हभप बंडतात्या कराडकर

व्यसनमुक्त युवक संघाच्यावतीने कोयना खोऱ्यात पूरग्रस्तांना मदत वाटप


टीम : ईगल आय मीडिया

कोयना धरण निर्मितीत तुम्ही तुमची जमिन गमावली त्यावर खालच्या भागातील शेतकरी सधन आहे. तुमचा त्याग मोठा आहे म्हणूनच जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे आपुले या न्यायाने आज आपल्यावर ओढवलेल्या अस्मानी संकटात मदतीचा हात देणे हे समाजाचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन हभप बंडातात्या कराडकर यांनी केले. व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीने कोयना विभागातील येरणे, देवसरे, सोनाटसह ११ गावातील आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत देण्यात आली. सौंदरी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बंडतात्या कराडकर बोलत होते.


व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्यावतीने गेल्याच आठवड्यात जावळी तालुक्यातील अनेक गावांना मदत केल्यानंतर या आठवड्यात महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी व त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी सौंदरी ( ता.महाबळेश्वर ) या ठिकाणी या परिसरातील ११ गावातील लोकांना एकत्र बोलवण्यात आले होते. अतिवृष्टी मध्ये उध्वस्त झालेल्या येरणे खु., येरणे बु., देवसरे,आचली, तालवाडी, पवारवाडी, बौद्धवस्ती,विवर, पो. खांबील, मजरेवाडी, घावरी, सोनाट, कुरोशी या ११ गावातील शेतकऱ्यांना ११०० रुपये किमतीची २७ वस्तु असलेले किट व प्रत्येक कुटुंबाला ६० किलो धान्य देण्यात आले.


याप्रसंगी बोलत असताना बंडातात्या म्हणाले व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून कांबळेश्वर (बारामती) शेरे,शिरावडे,कोपर्डे हवेली (कराड) सोळशी ( कोरेगाव) सोनगाव ( सातारा) शिंदेवाडी ( माळशिरस) या गावांनी दिलेले ६५०० किलो धान्य आज या ठिकाणी वाटण्यात आले आहे. आपल्या संकटकाळी मदत करणे हे आम्ही कोणत्याही उपकाराच्या भावनेतून करत नसून सामाजिक कर्तव्याची जबाबदारी निभावत आहोत आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्यच आहे.

शेती बरोबरच कांदाटी लामज येथील शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत त्या शेतकऱ्याला आमच्या गोपालन केंद्रातून आवडतील ती जनावरे देण्यास आम्ही तयार आहे. गरीब व गरजू मुलांना ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत. राष्ट्रबंधु राजीव दीक्षित गुरुकुल पिंपरद या ठिकाणी आपली मुले पाठवा त्यांना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही उचलत आहोत, असेही बंडतात्या यावेळी म्हणाले.


यावेळी बोलताना व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष शहाजी काळे यांनी सांगितले की, भविष्यकाळात अतिवृष्टी मध्ये उध्वस्त झालेलं एक गाव पूर्णपणे उभे करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.
यावेळी विलासबाबा जवळ, बाबुराव सपकाळ, धोंडीराम महाराज सपकाळ, अशोक महाराज, आनंद जाधव,नंदू जगताप, बाळासाहेब शेरेकर, माउली यादव तसेच कोयना विभाग वारकरी मंडळातील पदाधिकारी व वारकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी प्रास्ताविकात या भागाची व्यथा मांडली तर आभार पांडुरंग महाराज जाधव यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!