पंढरपूर : ईगल आय मीडिया
जेष्ठ सावरकरवादी नेते, हिंदु महासभेचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष ह भ प वासुदेव नारायण तथा वा ना महाराज उत्पात यांचे आज दुपारी पुण्यात कोरोनामुळे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे.
वा.ना. उत्पात हे हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला तसेच सावरकर साहित्याचा प्रसार केला. त्यांनी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. कै. वा.ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व आध्यात्मक्षेत्रातील प्रमुख नाव असून त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भुषविले होते. ते येथील प्रसिध्द शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. ते कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते.
कै. वा.ना. उत्पात हे पंढरपूर अर्बन बँकेचे प्रदीर्घकाळ संचालक होते. तसेच त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदि समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली व भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून भव्य वास्तू व क्रांतीमंदिराची उभारणी केली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय केली होती. त्यांच्या निधनाने हिंदुत्ववादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.