वाखरी ओढ्यावरील बंधाऱ्याचा भरावा वाहून गेला

पंढरपूर : ईगल आय मीडिया
वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्याचा उजव्या बाजूचा भरावा पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला असून बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने हा भरावा भरून घेण्याची मागणी होत आहे.

वाखरी येथील ओढ्यावर सुमारे दहा वर्षापूर्वी यल्लमा देवीच्या मंदिराजवळ सिमेंट बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्यात पावसाचे तसेच उन्हाळ्याच्या काळात उजनी कालव्यातून सोडलेले पाणी साठवले जात होते. त्यामुळे वाखरी गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला होता.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा

सध्या पंढरपूर तालुक्यात सातत्याने पाऊस पडत असून मागील दीड महिन्यापासून हा बंधारा ” ओव्हरफ्लो ” वाहतो आहे. कोर्टी, तिसंगी,.सोनके, गादेगाव या परिसरातील पावसाचे पाणी याओढ्याद्वारे भीमा नदीला जाऊन मिळते. या परिसरात 29 जुलै रोजी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे 30 जुलै रोजी पहाटेपासून वाखरी ओढ्याला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि पावसाचे पाणी पात्राबाहेर पडून शेतातून वाहत होते. येथील सिमेंट बंधाऱ्यात पाणी मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे बंधाऱ्याच्या उजव्या बाजूला मातीचा भराव गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वाहून गेला आहे. बंधाऱ्याच्या बाजूची सुमारे वीस फूट माती वाहून गेल्यामुळे बंधारा निरुपयोगी झाला आहे. टंचाईच्या काळात बंधाऱ्यात पाणी साठा होणार नाही. त्यामुळे तातडीने हा भरावा भरून द्यावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!