वाखरीतील बिअर शॉपी ठराव रद्द होणार ?

आज सदस्यांची मासिक मीटिंग : लवकरच महिलांची विशेष ग्रामसभा

पंढरपूर : ईगल आय मीडिया


वाखरी ( ता.पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या 28 ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेत 23 नवीन बिअर बार, बिअर शॉपीस ना हरकत देण्याचा करण्यात आलेल्या ठरावाबाबत सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर हा ठराव रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आज सदस्यांनी मासिक बैठक बोलावली असून लवकरच महिलांची विशेष ग्रामसभा आयोजित करून पहिला ठराव रद्द केला जाण्याची शक्यता आहे.

वाखरी ग्रामपंचायत ने ग्रामसभेत 23 बिअर शॉपी ना हरकत ठराव मंजूर केला आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायातून तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वारकरी, फडकरी संघटना, व्यसनमुक्त युवक संघ, विश्व वारकरी सेना यांच्या प्रमुखांनी संतांच्या भूमीत दारू आणि बिअर बार  नकोत अशी भूमिका जाहीर केली आहे.


 पालखी मार्गावरील वाखरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा 28 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. या ग्रामसभेत बिअर शॉपी आणि बार सुरू करण्याची मागणी करणारे 23 अर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्येकी 1 लाख रुपये ग्राम विकास निधी देऊन या अर्जाना ग्रामसभेत ना हरकत ठराव करण्यात आला. 


ग्रामसभेत गोंधळ घालून, लॉबिंग करून बिअर बार अर्जधारकांनी ठराव मंजूर करून घेतला असला तरीही हा ठराव रद्द करण्यात यावा यासाठी आता ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. आज ग्रामपंचायत सदस्यांची बैठक होत असून लवकरच विशेष ग्रामसभा, आणि महिलांची ग्रामसभा घेऊन सर्व बिअर शॉपी आणि बिअर बार चे नाहरकत अर्ज रद्द करण्याची तयारी सुरू आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!