पंढरपूर नगरपालिका हद्दवाढीला वाखरी ग्रामस्थांचा विरोध


विशेष ग्रामसभा घेऊन केला ठराव : आंदोलनासह न्यायालयात जाण्याचाही ईशारा 

पंढरपूर : ईगल आय न्यूज

पंढरपूर नगरपालिका हद्दवाढ आणि त्यामध्ये वाखरी गावचा समावेश करण्यास वाखरी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात  वाखरी   ग्रामपंचायतीची या एकाच विषयावर विशेष ग्रामसभा दि 26 सप्टेंबर रोजी  ग्रामपंचायत कार्यालयासमोर संपन्न झाली.  सरपंच श्रीमती धनश्री साळुंखे या सभेच्या  अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी ग्रामस्थांनी एकमताने  विरोध दर्शविला आहे.


 तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांच्या अध्यक्षतेखाली  सोलापूर येथे दि.१२ सप्टेंबर रोजी झालेल्या सुधारित आराखड्यासंदर्भात  बैठकीमध्ये पंढरपूर नगरपरिषद हद्दवाड करणे या कामाचा उल्लेख आहे. त्या हद्दवाढ कामामध्ये वाखरी ग्रामपंचायतचा समावेश करण्यात आलेला आहे.  त्यासंदर्भात वाखरी ग्रामपंचायतीने केवळ याच विषयावर विशेष ग्रामसभा आयोजित केली होती या सभेत नगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावास वाखरी ग्रामस्थांनी  विरोध  केला.


ज्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नगरपालिका हद्दवाड प्रस्तावित आहे ती विकास कामे करण्यास वाखरी ग्रामपंचायत सक्षम आहे. सध्यस्थितीत ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील गावठाणासह वाड्या-वस्त्यावर पुढील ३० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली आहे. गावातील  ७०% नागरिक वाडी-वस्तीवर राहत असून गावाच्या कार्यक्षेत्रात सर्व वाडीवस्तीवर जिल्हापरिषद शाळा व अंगणवाडीच्या आर.सी.सी. इमारती आहेत. वाखरी गावातील सर्व अंतर्गत रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत.  पालखी सोहळा व वारकरी संप्रदायात वाखरी गावचे  स्वतंत्र स्थान आहे, हे स्थान अबाधित रहावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.  दरवषी येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी सर्व त्या मुलभूत सोयी – सुविधा ग्रामपंचायत सक्षम पणे पुरवीत आहे. याबाबत पालखी सोहळ्याने आजवर कधीही तक्रार केलेली नाही. 


वाखरी गावचे एकूण लागवडी खालील शेती क्षेत्रफळ २ हजार ८५३ हेक्टर इतके असून ग्रामस्थांचे शेती हे उपजीविकेचे मुख्य साधन आहे.  वाखरी गावातील जमिनीचे विविध प्रकल्पासाठी यापूर्वी भूसंपादन झालेले आहे, ग्रामपंचायतीच्या  गावठाणातील सर्व घरे आणि मालमत्ताचा सीटी सर्वे झालेला आहे. वाखरी गावचे क्षेत्रफळ लक्षात घेता दैनंदिन सोयी – सुविधा व प्रशासकीय कामासाठी पंढरपूर नगरपालिकेत जाणे ग्रामस्थांसाठी गैरसोयीचे ठरणार आहे.  वाखरीच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, नगरपालिकेच्या विविध करांचा भुर्दंड असह्य ठरणार आहे. 

 त्यामुळे एकूणच सर्व बाजूनी विचार करता विशेष ग्रामसभेत पंढरपूर नगरपालिकेच्या हद्द वाढीस व त्यामध्ये वाखरी ग्रामपंचायतीचा समावेश करणेस एकमताने तीव्र विरोध करण्यात आला आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य  पांडुरंग तुळशीराम पिसे यांनी हद्दवाढीच्या आणि।नगरपालिका क्षेत्रात वाखरीच्या समावेशाला विरोध करणारा ठराव मांडला आणि त्यास पंतकृपा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाब दिगंबर पोरे  यांनी अनुमोदन दिले. सर्व ग्रामस्थांनी यावेळी टाळ्यांच्या गजरात या ठरावाचे स्वागत केले. तसेच ग्रामस्थांच्या परस्पर प्रशासनाने हद्दवाढीचा प्रयत्न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा, प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही ठराव यावेळी करण्यात आला.


ठरावाची प्रत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयास इमेल द्वारे पाठवण्यात आली असून तालुका पातळीवरील सर्व राजकीय नेत्यांना भेटून ग्रामस्थांचा विरोध कळवण्यात येणार आहे. असे यावेळी सरपंच धनश्री साळुंखे यांनी सांगितले. उपसरपंच सोमनाथ पोरे यांनी आभार मानले. यावेळी  माजी सरपंच गंगाधर गायकवाड, अभिमान साळुंखे, गुलाब पोरे, पांडुरंग पिसे, चंद्रकांत मस्के, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!