डबल डोस घेतलेल्या दोघांसह 17 पॉझिटिव्ह
पंढरपूर : ईगल आय मीडिया
वाखरी ( ता. पंढरपूर ) गावात कोरोनाने पुन्हा उसळी घेतली असून गावातील रुग्णसंख्या दोन दिवसात 17 झाली आहे विशेष म्हणजे यामध्ये दोन जण कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले फ्रंटलाईन वारीयर आहेत. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
वाखरी गाव कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरले होते. गावात 800 पेक्षा जास्त रुग्ण संख्या होऊन गेली तसेच 32 जनांचा मृत्यू यादरम्यान झाला आहे. मागील महिन्याभरात कोरोनाचा प्रकोप कमी होऊन रुग्ण संख्या अगदी 2 वर आलेली होती. गावात सामान्य परिस्थिती निर्माण झाली असताना गेल्या 8 दिवसांपासून पुन्हा नव्याने रुग्ण सापडू लागले आहेत.
गावात कोरोनाचे रुग्ण पाहता आणि आषाढीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्ष्यात घेता गावात लसीकरण ही मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. मात्र मागील आठवड्यात फ्रंटलाईन वारीयर असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लागण झाली असून त्यांचे दोन्ही डोस दोन महिन्यांपूर्वी च झालेले आहेत. तरीही ते पॉझिटिव्ह आल्यामुळे ग्रामस्थ हादरले आहेत.
बुधवारी गावातील 12 जणांच्या कोविड टेस्ट केल्या असता 10 जण पॉझिटिव्ह निघाले त्यामुळे गावात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने गावातील संपर्क साखळी शोधून रॅपिड टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
मात्र सौम्य लक्षणे असलेले लोक तपासणी साठी समोर येत नाहीत किंवा पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलेले लोक तपासणी करीत नाहीत. आरोग्य विभागाच्या लोकांशी हुज्जत घालून घरातच बसत असल्याचेही दिसून आले. त्यामुळे गावात आणखी रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अत्यंत धक्कादायक बाब आहे ही.
लोकांच्या बेजबाबदरपणामुळे ही वेळ आली आहे. नियम कडक केले पाहिजेत.