वाखरी येथील भरदिवसा घडलेली घटना
पंढरपूर : ईगल आय मीडिया
मी सीआयडी अधिकारी आहे, गांजा पुड्या विकणारा माणूस शोधत आहे, असे सांगून रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वारास अडवून हातचलखीने त्यांच्याकडील 1 लाख75 हजार रुपयांचे दागिने काढून घेतल्याची घटना बुधवार दि.20 जुलै रोजी घडली आहे. या घटनेत, अंकुश रामचंद्र मोहिते, ( वय 49 वर्षे रा.उपरी ता.पंढरपूर ) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
यासंदर्भात अधिक वृत्त असे की, फिर्यादी अंकुश मोहिते हे हे आपल्या दुचाकीवरून त्यांचा मेव्हणा किसन नागणे यांच्यासोबत शेगाव दुमाला ता.पंढरपूर येथे लग्नास गेले होते. लग्नाहून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गावाकडे परत येत होते. त्यावेळी वाखरी येथील पालखी तळ चौकाच्या पूर्व बाजूला चिंचेच्या झाडाजवळ एका दुचाकी स्वाराने अंकुश मोहिते यांनी दुचाकी थांबवण्यास भाग पाडले. त्यावेळी आपण सीआयडी चे अधिकारी आहोत आणि गांजा घेऊन जाणाऱ्या माणसांचा तपास घेत आहोत, अशी बतावणी केली.
त्यानिमित्ताने अंकुश मोहिते यांना त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन, 1 तोळा सोन्याची अंगठी, खड्याची आणखी एक तोळ्यांची अंगठी काढण्यास सांगितले. आणि रुमालात बांधून दिल्याचा भास निर्माण केला. घरी आल्यानंतर अंकुश मोहिते यांनी रुमाल तपासला असता रुमालात केवळ लायसन्स सापडले. अंगठ्या, सोन्याची चेन असा प्रश्न लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केलेला होता. फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर पुतणे शहाजी सुरेश मोहिते व शहाजी शिवाजी नागणे यांच्यासह पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.