तरीपण आनंदाची गोष्ट अशी की ..!
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोमवारी वाखरीत घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टच्या कॅम्पमध्ये 120 तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 14 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्कर्ष निघाले. मात्र आनंदाची गोष्ट अशी की, या 14 मध्ये मूळ वाखरी गावातील एकही रुग्ण नाही. पंढरपूर शहर आणि इसबावी लगतच्या भागातील सर्व 14 रुग्ण आहेत. त्यामुळे वाखरी गाव आज पुन्हा कोरोना मुक्त झाले आहे.
वाखरी येथे सोमवारी रॅपिड अँटीजन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पमध्ये 120 लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यातील 14 लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वाल्मिकीनगर येथील 4 आणि शेळके वस्ती येथील 1 नागरिक आहे. तर 9 जण पंढरपूर शहरातील आहेत. त्यांनी वाखरीत येऊन टेस्ट केली आहे.
या 14 मध्ये वाखरी गावठाण किंवा वाड्या वस्तीवरील एकही रुग्ण नाही. जे सापडले आहेत, त्यांचा गावशी किंवा गावातील लोकांशी सम्पर्क येत नाही. त्यामुळे वाखरी गाव आज पुन्हा कोरोना मुक्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी मागील महिन्यात गावात केवळ 2 घरातील 6 लोक पॉझिटिव्ह आले होते तेसुद्धा उपचारानंतर घरी सुखरूप आहेत. त्यामुळे आता मूळ वाखरीकरांपैकी एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. वाखरी ग्राम समिती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नाला यश येत आहे. पंढरपूर शहरात 1 हजारांवर रुग्ण झाले आहेत. शहरास लागून असलेल्या गोपाळपूर, लक्ष्मी टाकळी येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. तरीही सुमारे 8 हजार लोकसंख्या असलेल्या वाखरीकरांनी कोरोनाला दूर ठेवल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे.