6 वार्डातील 14 जागांसाठी निवडणूकीत ८० टक्के मतदान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अतिशय चुरशीने आणि इर्षेने निवडणूक लढवणार्या वाखरीकरांनी निवडणूकीचा समारोप मात्र राजकीय कटुता बाजूला सारून केला. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त निवड6 रिंगणातील उमेदवार, दोन्ही पॅनल चे प्रमुख, कार्यकर्ते यांनी एकमेकांना तिळगुळ देऊन एक राजकीय लढाईचा गोड समारोप केला आहे.
दरम्यान, गावातील ४८१४ मतदारांपैकी ३८८७ मतदारांनी आपला हक्क बजावला. एकुण ८०.७४ टक्के मतदान झाले असून यामध्ये तरुणाईचा ऊत्साह दिसुन आला. प्रभाग क्र ०१ मध्ये ६३९पैकी ५०२ , प्रभाग क्र ०२ मध्ये ९६८पैकी ८२९, प्रभाग क्र ०३ ७७७ पैकी ६५०, प्रभाग क्र ०४ मध्ये ६६७ पैकी ५७०, प्रभाग क्र ०५ मध्ये ७६० पैकी ५७६ , प्रभाग क्र ०६ मध्ये १००३ पैकी ७६० इतके मतदान झाले असुन प्रभाग क्र ०२ मधील आकडेवारी सर्वाधिक आहे.
वाखरी ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक होत असून 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत आणि 14 जागांसाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मागील 15 दिवसांपासून अतिशय चुरशीने प्रचार झाला. मतदानाच्या दिवशी दुपारी आश्रमशाळा केंद्रावर कार्यकर्त्यांची बाचाबाची सुद्धा झाली. मात्र ग्रामस्थांनी वातावरण शांत केले आणि मतदान प्रक्रिया सुरळीत संपन्न झाली.
सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने तिळगुळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी परस्परविरोधी निवडणूक लढवणार्या उमेदवारांनी एकमेकांना तिळगुळ देत ‘ तिळगुळ घ्या, गोड बोला ‘ अशी स्नेहाची साद घातली. यावेळी दोन्ही पॅनेलचे नेते आणि कार्यकर्त्यांनी ही एकमेकांना शुभेच्छा देत राजकीय कटुतेला तिलांजली दिली. हसत खेळत, गप्पा विनोद करीत सर्व उमेदवार, कार्यकर्ते परत घरी गेले.