पालखी मार्गावरील वाखरी गावात उडणार बिअरचा बार !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर -देहू-आळंदी या पालखी मार्गावरील लाखो वारकऱ्यांचे मुक्काम आणि विसाव्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या वाखरी ( ता.पंढरपूर ) या गावात गुरुवार ( दि.28 ऑक्टोबर) रोजी झालेल्या ग्रामसभेत तब्बल 23 नव्या बिअर शॉपीना ना हरकत देणारा ठराव करण्यात आला आहे. गावची लोकसंख्या 2011साली 8 हजार होती, त्याचा विचार करता गावात 347 लोकमागे एक बिअर बार होणार आहे.
गावात नवीन बिअर बार, आणि शॉपी सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे 23 अर्ज आले होते.गावात यापूर्वीच 3 बिअर शॉपी सुरू आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्वच 17 सदस्यांनी हे बिअर शॉपी परवानगी मागणीचे अर्ज फेटाळले होते.मात्र ग्रामसभेत बिअर शॉपी अर्ज धारकांनी लॉबिंग करून गोंधळ घातल्याचे दिसून आले. अखेरीस प्रत्येक अर्ज धारकाकडून 1 लाख रुपये ग्रामनिधी घेऊन शॉपी ला परवानगी देण्यात येईल असा ठराव करण्यात आला.
गावात यापूर्वी काही बिअर शॉपी ना मंजुरी दिलेली आहे, त्या सुरू झालेल्या आहेत. नव्याने आलेल्या अर्जावर ग्रामसभेत विचार करून एकमताने ठराव करण्यासाठी विषय मांडला होता. महिला सदस्यांनी विरोध केला होता.मात्र ठरावाच्या बाजूने जास्त ग्रामस्थांनी मागणी केल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्व अर्ज मंजूर करण्याचा ठराव करावा लागला. मात्र त्यासाठी 1 लाख रुपये ग्राम निधी जे देतील त्यांनाच परवानगी दिली जाईल असा निर्णय झाला आहे.सौ. कविता तुकाराम पोरे,
सरपंच ग्रामपंचायत वाखरी.
सरपंच सौ कविता पोरे यांनी यापूर्वी आलेल्या अर्जाना मंजुरी दिलेली असून त्या शॉपी सुरू आहेत. त्यामुळे आता नव्याने आलेल्या बिअर शॉपी मागणी अर्जाचा ठराव मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र जे अर्ज धारक 1 लाख रुपये ग्रामनिधी जमा करतील त्यांनाच मंजुरी दिली जाईल असा ठराव करण्यात आल्याचेही सांगितले.
वाखरीची ग्रामसभा बिअर शॉपीच्या ठरावामुळे वादळी ठरू शकते हे लक्षात घेऊन बिअर शॉपीसाठी अर्ज केलेल्या लोकांनी लॉबिंग केल्याचे दिसून आले. बिअर शॉपीचा ठराव करा, अशी मागणी लावून धरण्यासाठी बिअर शॉपी अर्जदारांनी मोठ्या संख्येने आपापले समर्थक आणल्याचे दिसून आले.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरताच संपन्न झालेल्या
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.कविता पोरे या होत्या. उपसरपंच संग्राम गायकवाड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि शंभराहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.