वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्णांचा ही जीव धोक्यात
पंढरपूर : ईगल आय मीडिया
वाखरी ( ता.पंढरपूर ) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची इमारत पार दुरवस्थेला आली असून सध्याच्या घडीला इमारतीला सर्वत्र गळती लागली आहे. स्लॅब चा भाग अनेक ठिकाणी पडलेला आहे. तरीही जीव धोक्यात घालून येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सेवा करावी लागत आहे.
वाखरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची इमारत सुमारे 35 वर्षे जुनी आहे. इमारत जुन्या काळात लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेली असून आता इमारत मोडकळीस आलेली आहे. संपूर्ण इमारत धोकादायक झालेली आहे.
सध्या पावसाळ्याच्या दिवसात इमारतीच्या अनेक खोल्यांच्या स्लॅबचे तुकडे पडताना दिसून येत आहेत. सर्वच खोल्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली असून कार्यालयीन दप्तर तसेच मेडिसिनचा साठा ही यामुळे भिजून खराब होतो आहे. इमारत डागडुजी करण्याच्या ही पुढे गेली असून ती पाडून नव्याने बांधण्याची गरज निर्माण झालेली आहे.
वाखरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा मिळत आहे. मात्र उपकेंद्रांची इमारत 30 ते 35 वर्षे जुनी आणि धोकादायक झालेली आहे. लवकरात लवकर आरोग्य विभागाने नव्या इमारती साठी प्रयत्न करावेत. अशी आमची मागणी आहे.
सौ.कविता तुकाराम पोरे, सरपंच ग्रामपंचायत सदस्य, वाखरी
या आरोग्य केंद्राची इमारत गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक बनली आहे. हे लक्षात घेऊन एक वर्षांपूर्वी आरोग्य विभागाने विठ्ठल अभियांत्रिकी च्या विध्यार्थ्यांकडून या इमारतीचे पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे. त्यावेळी ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हापरिषदेला दिला आहे. त्यानंतर या इमारतीसाठी निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र निधी उपलब्ध झाला नसल्याचे झेडपी सदस्या सविता निखीलगीर गोसावी यांनी सांगितले.
सध्या कोरोनाच्या काळात उपकेंद्रांतील वैद्यकीय कर्मचारी अतिशय जोखीम घेऊन येथे काम करीत आहेत. कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळत असतात, त्यामुळे कामाचा ताण कायम असताना वरून इमारत धोकादायक बनली असल्याने जीव मुठीत धरून वैद्यकीय कर्मचारी काम करीत आहेत. तालुका आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने तात्पुरती व्यवस्था अन्यत्र करून नव्या इमारतीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.