ज्ञानोबा, तुकोबा मुक्ताई आली, वाखरीत अशी संत भेट झाली !

वाखरी पालखी तळावर जमला पारंपरिक संत मेळा

टीम : ईगल आय मीडिया

आषाढी एकादशी आणि पालखी सोहळ्याच्या परंपरेत वाखरी येथील अखेरचा मुक्काम अनन्यसाधारण महत्वाचा आहे. यंदा कोरोनामुळे पालखी सोहळा स्थगित झाला असला तरी,वाखरी पालखी तळावरील संत भेटीची परंपरा मात्र अखंडित राहिली आहे. प्रमुख संतांच्या सात पालख्या मंगळवारी वाखरी पालखीतळावर परंपरेनुसार एकत्र आल्या आणि एकमेकांच्या भेटी घेतल्या, सुख दुःख जाणून घेत पंढरीसाठी प्रस्थान केले.

पंढरीच्या वारीमध्ये आषाढी यात्रेला सर्वोच्च स्थान आहे, आणि याच आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून तसेच परराज्यातूनही संतांचे पालखी सोहळे दरवर्षी निघतात. त्यांच्यासोबत हजारो दिंड्या आणि लाखो भाविक, वारकरी ऊन पाऊस झेलत शेकडो किलोमीटरची पायपीट करतात. या प्रवासात शिणल्या, थकल्या-भागल्या नंतरचा शेवटचा मुक्काम वाखरी येथे असतो.
विविध भागातून, विविध मार्गांनी येणाऱ्या सर्व संतांच्या पालख्या, दिंड्या वाखरी येथील पालखी तळावर एकत्र येतात. येथे त्यांच्या परस्पर भेटी होतात, सुखदुःखाच्या गुज-गोष्टी होतात. मग संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपुरातून एक पंढरपूरकर म्हणून या संतांच्या स्वागतासाठी आणि त्यांना पंढरीत चला असा विठुरायाचा सांगावा घेऊन वाखरी पालखीतळावर येतात अशी आख्यायिका आहे.
त्या परंपरेनुसार सर्व पालखी सोहळे आषाढी दशमीचे दिवशी पंढरीकडे निघतात. यंदा मात्र कोरोना साथीमुळे ही परंपरा खंडित होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. वारकरी संप्रदायाने पालखी सोहळे घेऊन येण्याची परंपरा स्थगित केली, आणि प्रातिनिधिक स्वरूपात मानाच्या 9 पालख्या एसटी बस मधून पंढरपूरला घेऊन जाण्याची शासनाची विनंती मान्य केली. मात्र याच पालखी सोहळ्यातील मानाचे स्थान असलेल्या वाखरी येथील संत भेटीची परंपरा जपण्यासाठी वारकरी संप्रदाय आग्रही होता. त्यामुळेच वाखरी येथील पालखी तळावर आषाढ शुद्ध नवमीच्या ऐवजी दशमीच्या दिवशी सर्व संत एकत्र आले.

संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सर्वप्रथम संत निळोबाराय यांचे आगमन झाले. त्यानंतर 6 वाजण्याच्या सुमारास मुक्ताबाई आल्या तर पैठण येथून संत एकनाथ आले. नंतर सासवड येथून सोपानकाका, त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथ दाखल झाले. संत ज्ञानेश्वर माऊली आणि सासवड निवासी संत चांगावटेश्वर हे एकापाठोपाठ एक रात्री आठ वाजता दाखल झाले. नऊच्या सुमारास संत तुकोबारायांचे पालखीतळावर आगमन झाले. सर्व संतांच्या पादुका राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून आणल्या होत्या, या बसेस पुष्पहारानी सजवलेल्या होत्या. नियमानुसार सर्व संतांसोबत 20 वारकरी प्रतिनिधी होते. या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली होती.


वाखरी पालखी तळावर परंपरेनुसार सर्व संतांनी परस्परांच्या भेटी घेतल्या. बंधू ज्ञानोबा माउलींशी संत मुक्ताई, निवृत्तीनाथ आणि सोपानकाका यांची बंधू भेट झाली. त्याचवेळी सर्व संतांनी तुकोबारायांचीही भेट घेतली. सुमारे 1 तासभर पारंपरिक भजन , आरती झाल्यानंतर रात्री दहा वाजता सर्व संत पंढरीकडे मार्गस्थ झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरा जपण्याचा आनंद आणि समाधान पालखी सोहळा प्रमुख आणि वारकर्‍यांच्या प्रतिनिधीमध्ये दिसून येत होते. त्यांनी शासनाचे, पोलीस प्रशासनाचे, वाखरी ग्रामपंचायत आणि पंढरपूर नगरपालिकेचे आभार मानले. याठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सर्व वारकरी, आरोग्य, पोलीस कर्मचारी यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. संपूर्ण पालखी तळ पोलीस बंदोबस्तात चारही बाजूंनी सुरक्षित करण्यात आला होता. सोशल

डिस्टनसिंगच्या मर्यादा पाळत पालखीतळावर हरिनामाचा गजर टाळ-मृदंगाचा निनाद, आषाढी यात्रेची परंपरा अखंडित असल्याची साक्ष देऊन गेला. पालखी सोहळा अखंडित राहिल्याचे समाधान घेऊन संतांचे पंढरीत आगमन झाले.

पालकमंत्र्यांनी केले स्वागत :
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी आळंदी येथून मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे वाखरी येथील पालखी तळावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस मध्ये रुग्णवाहिका, पोलिस बंदोबस्त व्हॅन यासह रात्री आठ वाजता पोहोचल्या.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, नगराध्यक्ष साधना भोसले, सरपंच मथुराबाई मदने यांच्या उपस्थितीत माऊलींचे स्वागत करण्यात आले. पालखी स्थळाच्या ठिकाणी आल्यानंतर सर्वांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पादुका हरिनामाच्या गजरात पारंपारिक थाऱ्यावर नेण्यात आल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!