पंतकृपा ग्रा.बि. शेती सह. पतसंस्थेच्यावतीने दिमाखदार कार्यक्रम संपन्न

पंढरपूर : ईगल आय मीडिया
वाखरी (ता.पंढरपूर ) येथील नुतन सरपंच सौ कविता तुकाराम पोरे आणि उपसरपंच संग्राम गायकवाड यांनी मोठ्या थाटामाटात, वाजत – गाजत, फुलांनी सजवलेल्या कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे या वेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे समन्वयक सचिन जाधव यांचे ग्रामपंचायत आणि गावच्या कारभाराविषयी अमूल्य मार्गदर्शन मिळाले.
येथील पंतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने या आगळ्या वेगळ्या पदभार समारंभ आणि सत्काराचे नियोजन केले होते. यावेळी कोरोना आचारसंहितेचे पालन करून मोठ्या संख्येने ग्रामस्थ ही उपस्थित होते.
नुकतीच वाखरी ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली. त्यानंतर सरपंच पदी कविता पोरे तर उपसरपंच पदी संग्राम गायकवाड यांची निवड झाली. नूतन सरपंच आणि ग्रा.पं. सदस्याचा सत्कार गुरुवारी आयोजित केला होता. यानिमित्ताने संपूर्ण ग्रामपंचायतीचे कार्यालय सुंदर फुलांनी सजवले होते. सरपंच, उपसरपंच यांच्या कार्यालयात, सभागृहात गुलाबांच्या फुलानी सजावट केली होती. यावेळी सवाद्य मिरवणूक काढून, फीत कापून सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या पाठोपाठ ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यालयात प्रवेश केला आणि सरपंच, उपसरपंच यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी पंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन गुलाबराव पोरे, माजी पंचायत समिती सदस्य निखीलगिर गोसावी, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक इब्राहिम मुजावर, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ.संगीता पोरे, माजी उपसरपंच जोतिराम पोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस मारुती पोरे आदिसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे समन्वयक सचिन जाधव यांनी, ग्रामपंचायती मध्ये पाणी व स्वच्छता, आरोग्य व इतर योजनांची माहिती दिली.
ग्रामस्थांनी 100 टक्के कर भरावा, त्यातूनच गावचा विकास साध्य होईल. गावातील महिलांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतीने आरोग्य विभागासह पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायत कार्यालयात महिला सदस्यांसाठी चेंजिंग रूम असावी, गावात सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत जनजागृती करावी, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन करावे, गावातील अंगणवाडी केंद्रात मुलांना, मातांना सुविधा मिळतील याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे. पालखी मार्गावरील गाव असल्याने विकासाची मोठी संधी आहे, सर्व ग्रामस्थ, गावचे प्रमुख नेते एकोप्याने असतात असे दिसून येते, त्यामुळे विकसित झालेल्या गावचे गावभेट दौरे करावेत, गावात वृक्ष लागवड मोहीम राबवावी, आपले गाव कोरोना मुक्त राहावे यासाठी कोरोना विषयक आचारसंहिता काटेकोर पाळावी, गावातच कोरोना लसीकरण कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न करावा आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी निखीलगिर गोसावी,सरपंच कविता पोरे, उपसरपंच संग्राम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोरे यांनी प्रास्ताविक केले.
तर ग्रामसेवक एम.एम. जाधव यांच्यासह पंतकृपा पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील तवटे, सुनील पोरे, रघुनाथ पोरे, कर्मचारी श्रीमती मेटकरी, श्रीमती घाडगे, दत्तात्रय गजेंद्र पोरे, विमा प्रतिनिधी संतोष दिगंबर पोरे, ग्रामपंचायत कर्मचारी जितेंद्र पोरे, धर्मराज मेटकरी आदींनी परिश्रम घेतले. डॉ.धनाजी मस्के, पांडुरंग पोरे यांनी सूत्रसंचालन केले.